राजापूर नगर वाचनालय वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न
राजापूर (वार्ताहर): पुस्तक माणसं जोडण्याचे उत्तम काम करतात. शब्दांमध्ये खुप मोठी ताकद असते. डॉ. अब्दुल कलाम यांनाही पुस्तकांनीच घडविले. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. त्यामुळे पुस्तकांशी दोस्ती करा, पुस्तकं आपलं आयुष्य बदलतील असा कानमंत्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक आणि कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांनी येथे दिला.नगर वाचनालय राजापूर येथे आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि उत्तम वाचक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून श्री. आव्हाड बोलत होते.
नगर वाचनालय सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर नगर वाचनालयाचे कार्यवाह मदन हजेरी, उद्योजक प्रदीप भाटकर उपस्थीत होते.यावेळी श्री. आव्हाड यांच्या हस्ते कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार विठ्ठल नार्वेकर व सौ. वर्षा गोवळकर यांना प्रदान करण्यात आले. तर कै. प्र. र. देशपांडे स्मृती पुरस्कार आदर्श रविंद्र आग्रे, साक्षी रविंद्र शिंदे, आलिया आसिफ वाघू यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बालसाहित्यिक मदन हजेरी यांच्या चोरी झालेला सूर्य आणि मनी बुलबुल या नव्या पुस्तकांचे प्रकाशन श्री. आव्हाड व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी श्री. आव्हाड यांनी आपल्या हृदयस्पर्शी कविता आणि कथा सादरीकरणातून उपस्थीत वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांनी आपल्या भाषणात वाचनाचे महत्व विशद करतानाच आपल्या कवीता आणि कथेतून शिस्त आणि अविरत प्रयत्न् आपल्याला यशापर्यंत घेवून जात असल्याचे सांगितले. तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात अंतरंग मिसळा तुम्ही ते काम यशस्वीपणे करू शकाल. नशिबसुध्दा प्रयत्नांपुढे झुकत असते. प्रयत्नाने वाळवंटाचेही नंदनवन होते त्यामुळे प्रयत्न् करत रहा, यश तुमचेच आहे असे त्यांनी सांगितले. देवदत्त वालावलकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय मदन हजेरी यांनी करून दिला. यावेळी लेखिका सौ. ज्ञानदा असोलकर, सौ. मानसी हजेरी, सौ. मालती गोंडाळ, विजय कुबडे, मधुकर पवार, नॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सबा दादन, विश्वनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अक्षता रहाटे, गुजराळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल जायदे, सौ. कांबळे, सौ. बाणे, नकलाकार वसंत ठाकूर, वाचनालयाचे ग्रंथपाल सुहास ओळकर, अनिकेत नाडणकर यांसह शहरातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. ग्रंथपाल सौ. पद्मजा कारेकर यांनी केले तर आभार लिपिक दिपीका पवार यांनी मानले.