वैभववाडी | प्रतिनिधी
करूळ घाटात ऊसाचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातामुळे घाटातील अवजड वाहातूक ठप्प झाली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ५. वा. सुमारास घडली. मार्ग बंद झाल्याने या मार्गातील अवजड वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
वैभववाडीहून गगनबावडा साखर कारखान्याकडे ऊसाचा ट्रक जात होता. करूळ घाटातील धोकादायक वळणावर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यात ट्रकचालक व क्लिनर असे दोघेही किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. पलटी झालेला ट्रक घाट मार्गाच्या मध्यभागी आल्याने छोट्या कार व दुचाकी वगळता अवजड वाहने सुटू शकणार नाहीत. त्यामुळे या घाटमार्गातील अवजड वाहतूक राञी उशीरापर्यंत ठप्प झाली आहे. या मार्गावरील ही अवजड वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
पलटी झालेला ट्रक व आतील ऊस जेसीबी मशीनच्या सहाय्याने व स्थानिक कामगारांच्या साह्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या घाट मार्गावरील अवजड वाहतूक सुरळीत होण्यास विलंब लागणार आहे.
करुळ घाटातील खराब रस्त्यांमुळे घाटमार्ग मृत्यूचा सापळा बनत आहेत. खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होऊन वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
करुळ घाटातील खराब रस्त्यामुळे कोकणातील ऊस तोडणीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.