- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला.
गजानन महाराजांनी बापूना काळे यांना साक्षात विठ्ठलरूपात दर्शन दिल्यानंतर मंडळी शेगवी निघणार त्यावेळी पंढरपुरात ‘मरी’ रोगाने थैमान घातले होते. त्या कारणे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. पोलीस बंदोबस्त करून डॉक्टरांच्या हुकूमाने अंत्ययात्रा निघत होत्या. अशा वेळी या मंडळींबरोबर कवठे महाकाळ या गावचा एक वारकरी होता. वाऱ्हांड प्रांतीचा असल्यामुळे पाटील यांच्या वाड्यात मुक्कामी आला होता. त्यास मरीची बाधा झाली. (या व्याधीमध्ये रुग्णास ढाळ, उलटीचा त्रास होऊन रुग्ण अत्यंत अशक्त होतो आणि त्यामुळे मरण पावतो.) हा वारकरी आजारी पडल्याचे पाहून सोबतची मंडळी त्यापासून दूर दूर राहत होती. निघण्याची वेळ झाली तरी त्याला कोणी विचारी ना. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, “हा ओसरीवर निजला आहे, त्याला सोबत घेऊन चला.”
त्यावर लोक बोलले, “गुरुराया, हा बहुतेक मरण पावला. याला सोबत घेतल्यास आपणावरच संकट यायचे. आपल्यासोबत ५० माणसे आहेत. गावात ‘मरी’चा जोर आहे. अशा स्थितीत येथे थांबणे बरे नव्हे. चला लवकर. चंद्रभागेच्या पार निघून जाऊ.” त्यावर महाराज त्यांना म्हणाले, “तुम्ही कसे खुळावलात. आपल्या देशबंधूला आजारी अवस्थेत एकटे सोडून जाता”.
एवढे लोकांना बोलून महाराज स्वतः त्या रुग्ण वारकऱ्याजवळ गेले. त्याला हात धरून उठविले आणि बोलले “चाल बापा. उठ आता. आपल्या वऱ्हाड प्रंती जाऊया”. यावर वारकरी म्हणाला, “सद्गुरू नाथा, आता कसला वऱ्हाड प्रांत? आता माझा अंत:काळ जवळ आला. माझ्या समीप कोणी आप्त नाही.” त्यावेळी महाराज त्याला उत्तरले, “वेड्या ऐसा घाबरू नकोस. तुझे गंडांतर टळले आहे.” असे बोलून त्याच्या शिरावर महाराजांनी हात ठेवला. (त्याला आशीर्वाद देऊन महाराजांनी त्याचे गंडांतर टाळले).
हा प्रसंग संत कवी दासगणू महाराज यांनी खालील दोन ओव्यांतून रचनाबद्ध केला आहे :
ऐसे वदून जवळ गेले।
वारकऱ्याच्या करा धरिले।
त्यासी उठून बसविले।
आणि केले मधुरोत्तर॥ ७१॥
चाल बापा उठ आता।
जाऊ आपल्या वऱ्हाड प्रांता।
वारकरी म्हणे गुरुनाथ।
आता वऱ्हाड कष्याचे हो?॥ ७२॥
समीप आला माझा अंत।
जवळ नाही कोणी आप्त।
तई म्हणाले सद्गुरूनाथ।
वेड्या औसा भिऊ नको॥७३॥
तुझे टळले गंडांतर।
ऐसे वदोनी ठेविला कर।
त्या वारकऱ्याच्या शिरावर।
ढाळ उलटी बंद झाली॥ ७४॥
वाटू लागली थोडी शक्ती।
उभा राहिला त्वरित गती।
संताने ज्या धरिले हाती।
त्याते निजमने यम नेई
कैसा?॥ ७५॥
अशा रीतीने महाराजांनी अत्यवस्थ असलेल्या वारकऱ्यास जीवनदान दिले. हे पाहून सर्व भक्तांनी महाराजांचा जयजयकार केला व परत शेगावी येण्यास मंडळी निघाली. पुढे एकदा एक विप्र श्री महाराजांच्या दर्शनार्थ शेगाव येथे आला. त्याने त्याच्या प्रांतामध्ये श्री गजानन महाराजांची कीर्ती ऐकली होती, म्हणून दर्शनाकरिता शेगाव येथे आला. हा विप्र थोडा मध्वमती आणि कर्मठ होता. सोवळ्या-ओवळ्याचे पालन करणारा होता. श्रीमहाराजांचे विदेही रूप पाहताच खट्टू झाला. त्याला वाटले की, कुठून आलो यांच्या दर्शनाला. येथे सोवळे-ओवळे काही नाही. अनाचार आहे. सदैव गांजा पितात इत्यादी विचार करू लागला. हा विप्र पूजेकरिता पाणी आणावयास निघाला. तो त्या वाटेत एक कुत्रे मरून पडले होते. हे पाहून तो विप्र मनात खिन्न झाला आणि अद्वातद्वा बोलू लागला. तो जे काही बोलला ते सर्व महाराजांनी ऐकले आणि महाराज उठून तिथे आले. त्या विप्राचा संशय दूर करण्याकरिता विप्राला म्हणाले, “हे विप्रवरा व्यवस्थित पूजा करा. हे कुत्रे मृत झालेले नाही.” त्यावर तो ब्राह्मण रागावला आणि श्री महाराजांना बोलू लागला,
ते ऐकून रागावला।
निज समर्था बोलू लागला।
अरे नाही वेड मला।
तुझ्या सम लागलेले॥९१॥
कुत्रे मारून झाला प्रहर।
त्याचे प्रेत रस्त्यावर।
पडले याचा विचार।
तुम्ही न कोणी केला की॥ ९२॥
ऐसे ऐकता विप्राला।
समर्थांनी जाब दिला।
आम्ही भ्रष्ट आम्हाला।
तुमच्या सम ज्ञान नाही॥९३॥
असे बोलून त्या विप्राला महाराजांनी मागे येण्यास सांगितले. महाराज कुत्र्याजवळ आले आणि त्या कुत्र्यास महाराजांनी पदस्पर्श केला आणि चमत्कार बघा. लगेच तो कुत्रा उठून बसला. हा प्रकार पाहून तो विप्र चकित झाला. महाराजांच्या पायांना मिठी मारून क्षमायाचना तसेच प्रार्थना करू लागला. त्याच्या मनातील सर्व शंका-कुशंका पार फिटल्या. त्याच ठिकाणी त्याने महाराजांची समराधना केली.(शिष्यत्व पत्करले).