समस्यांच्या निपटार्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
नूतन फोंडाघाट ग्रामपंचायतचा कारभार गतिमान होण्याकडे वाटचाल
फोंडाघाट| कुमार नाडकर्णी : आढावा बैठकीमध्ये विविध विभागाच्या समस्या आणि अडचणी नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. अभ्यासपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणामुळे विकास कामांच्या पूर्ततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना जनता, विविध विभाग प्रमुख- कर्मचारी आणि स्थानिक पुढाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. याचा सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात पहावयास मिळेल,असे उद्गार नूतन सरपंच सौ संजना आग्रे यांनी काढताना सर्वांना धन्यवाद दिले.
नूतन ग्रामपंचायतचा कारभार गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती देऊन सध्या परिस्थितीत विविध विभागाचे विभाग प्रमुख व लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्यांची आढावा बैठक नुकतीच ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी नूतन सरपंचासह, उपसरपंच तन्वी मोदी व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक विलास कोलते यांनी स्वागत-प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.
वीज मंडळाच्या सर्वात जास्त समस्या होत्या.बिलवसुलीचा अट्टाहास, व्यापाऱ्यांचे नुकसान, मेंटेनन्स कडील अक्षम्य दुर्लक्ष, विजेचे वारंवार खंडित होणे, कार्यालयीन वीसंवाद, हलगर्जीपणा याकडे सर्वांनीच लक्ष वेधले. अभियंता यांना याची दखल घेऊन सुधारण्याची संधी देतानाच, हीच परिस्थिती कायम राहिल्यास वीज बिल न भरण्याचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला.
आरोग्य विभागात खाजगी डॉक्टरांचा मुद्दा ऐरणीवर होता. त्यांना पाळीपाळीने रात्री गावात थांबून सेवा देण्याची सूचना करताना, डॉक्टर सुद्धा एक माणूस असल्याने त्यांचेकडेही अत्यावश्य रुग्ण वगळता कार्यालयीन वेळेत रुग्णांनी तपासणीस यावे असे सुचित करण्यात आले. ग्रामपंचायत फोंडाघाट प्रा.आ. केंद्राची अवस्था सुधारण्याकडेही उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केले. ग्रामीण रुग्णालयासाठी जमीन मालकांशी संपर्क साधून प्रश्न सोडवावा असेही पुढे आले.
एसटी स्टँड आवारातील अस्वच्छता, स्वच्छतागृह, त्यासाठी कायमस्वरूपी स्वच्छतादूत, अपुरा शुद्ध पाणीपुरवठा, पार्किंग मध्ये सातत्य, मोकाट जनावरांचा परिसरातील वावर, होकर्स- विक्रेते,रीक्षा- ६ सीटर इत्यादी प्रश्न चर्चेस आले. सांगोपांग चर्चेनंतर ते सोडविण्याकडे एसटी विभाग आणि ग्रामपंचायत यांचे माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या समस्या, परप्रांतीयातील व्यावसायिकांचा बाजारपेठेतील वावर, रस्त्यावरील होकर्स इत्यादीवर चर्चा झाली. व्यापार कुठेही कायद्याच्या चौकटीत करण्याचे स्वातंत्र्य भारतातील नागरिकांना आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारामध्ये बदल करताना व्यापारी संघाकडून हे प्रश्न सोडवावेत. ग्रामपंचायततिकडून आवश्यक, योग्य आणि कायदेशीर सहकार्य लाभेल असे आश्वासित करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग टोल मुक्ती लढ्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे टोल वसुली विरोधाचा ठराव घेऊन पाठविण्यात यावा. तसेच ग्रामस्थांनीही सह्यांची मोहीम राबवावी असे आवाहन व्यापारी संघाचे प्रतिनिधी कुमार नाडकर्णी यांनी केले. या बैठकीत राजू पटेल, रंजन चिके, बाळा लाड, संजय सावंत, महेश सावंत, नारकरमॅडम,डॉक्टर शैलेंद्र आपटे, संजय आग्रे, भाई भालेकर, मोहन पाताडे, सीमा कदम, जयसिंग यशवंत मसुरकर, संदेश पटेल, ग्रामस्थ आणि विभाग प्रमुखांनी भाग घेतला…..