भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास
उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरही केली टीका
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्गतील लोकसभा मतदार संघातील सहाशे वॉरियर्स 19 डिसेंबरपर्यंत सव्वातीन लाख घरात जाणार आहेत. घर से संपर्क अभियान राबविले जाणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत लोकसभा मतदार संघात 51 टक्के मते घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आ. बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महायुतीच्या 45 जागा निवडून येतील असा विश्वास आहे. मागील नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या आहेत. देशाला एक मोठी उंची गाठून दिली आहे. राज्यातील 32 हजार लोकांना आपण भेटलो . फक्त 13 लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून नको आहेत. त्यांना सोडल्यास बाकींनी मोदी पंतप्राधन व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्येही महायुतीचा उमेदवार 51 टक्के मते घेऊन विजयी होईल. येथील खासदार मोदींसाठी लोकसभेमध्ये हातवरती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दक्षिण रत्नागिरीतील तिनशे वॉरियर्स नी प्रत्येक विधानसभा मतदार संघात साठ हजार घरांपर्यंत पोहचायचे आहे. मतदार संघातील साडेतीन लाख घरांपर्यंत पुढील दोन महिन्यात भेट देणार आहोत. संपर्क ते समर्थनच्या माध्यमातून घराघरात जाणार आहोत, त्यासाठी येथील पदाधिकार्यांनी आज मोदींना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला आहे. 2024 च्या मोदींच्या नेतृत्वाखाली अमृत काळातील भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी असे सांगितले.
शरद पवार यांनी पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे. त्यासाठी शरद पवारसाहेब यांचा निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांना आपला प्रश्न आहे. त्यांनी 28 पक्षांची इंडी आघाडी तयार केली आहे. त्यातील एक सहकारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र उदयनिधी यांनी हिंदू सनातन संस्कृती संपवण्याची भाषा केली. त्यामुळे उध्दव ठाकरे हे त्यांची युती तोडणार आहेत का, हिंदुत्वाच्या भुमिकेच्या बाजूने राहणार आहेत का, परंतु 2019नंतर उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाची वाट लावल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. त्यामुळे उध्दवजींनी हिंदु धर्माच्या विरोधात असलेल्यांसोबतची युती तोडावी असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाप्रमुख प्रमोद जठार, रत्नागिरी विधानसभाक्षेत्रप्रमुख माजी आमदार बाळ माने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.