सावंतवाडीतील भाजपा कार्यकर्त्यांना नाराज करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

 

तिन्ही मतदारसंघात भाजप लढण्याचे दिले संकेत 

सावंतवाडी भाजप प्रदेश वॉर रूम कार्यालयाचे उद्घाटन 

शतप्रतिशत भाजपचा नारा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : 

कोकणात एकेकाळी भाजपची अशी बिकट परिस्थिती होती की भाजपचा झेंडा लावण्यासाठीही कार्यकर्ता मिळत नव्हता. मात्र, आज ५१ टक्के भारतीय जनता पार्टी बनविण्याचे काम येथील नेते व कार्यकर्त्यांनी केले आहे त्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाढलेल्या या ताकदीचा विचार करून पक्षही कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे. शेवटी जिंकण्याला महत्व आहे. आमदार नितेश राणे यांनी विजयाची खात्री देत तिन्ही ठिकाणी कमळ चिन्ह मागितलं आहे. त्यामुळे या मागणीचा नक्कीच विचार हाईल व सावंतवाडीतील कार्यकर्त्यांना नाराज केलं जाणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शतप्रतिशत भाजपचा नारा दिला.

सावंतवाडी शहरातील भाजप प्रदेश वॉर रूम कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सोशल मिडीया प्रमुख नवनाथ बन, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रथमेश तेली, जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या वॉर रूम कार्यालयामुळे केंद्र व राज्यातील विविध योजना आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. या जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांचे काम अव्वल आहे. भाजपची बुलंद तोफ म्हणून त्यांना ओळखले जाते. विधानसभेतही त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजत आहेत. कुडाळ मतदार संघातही विधान सभा प्रमुख निलेश राणे यांनी भाजपची संघटनात्मक मजबूत बांधणी केली आहे. तर सावंतवाडी मतदारसंघांत राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात भाजप नंबर वन ठरला आहे. येथील देव दुर्लभ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमूळेच हे शक्य झाले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.