सौजन्य : शिवसेना, भारतीय जनता पार्टी
मालवण | प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत “सागरा प्राण तळमळला” ह्या नाटकाचे प्रयोग मालवण आणि कुडाळ मध्ये मोफत दाखवले जाणार आहेत. शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने २१ आणि २३ ऑक्टोबर रोजी हे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे यांनी दिली.
मालवण शिवसेना शाखेत ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी दीपक मिठबावकर, नीलम शिंदे, गीतांजली लाड, भारती घारकर, यश देसाई आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून “सागरा प्राण तळमळला” हे नाटक दाखवले जाणार आहे. २१ रोजी सायंकाळी ७.३० वा. मामा वरेरकर नाट्यगृहात तर २३ रोजी कुडाळ मध्ये हे नाटक होणार आहे. या नाटकासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रवेशिका मालवण येथील शिवसेना शाखा (संपर्क – आकांक्षा पडवळ ८६९२९४१२४१) तसेच आचरा येथे हॉटेल राणेशाही येथे उपलब्ध असतील. या नाटकांना उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न आहेत. तर भाजपा नेते निलेश राणे हे २१ रोजी मालवण मधील नाट्यप्रयोगाला उपस्थित राहणार आहेत. तरी या नाट्य प्रयोगाला शालेय विद्यार्थ्यांसह पालकवर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.