सहा. पोलीस निरीक्षक सागर खंडागळेची जामिनावर मुक्तता

एक लाखाची लाच घेताना झाली होती अटक

सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : सावंतवाडीतील बिल्डरकडून एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याची जामिनावर मुक्तता झाली आहे. सागर खंडागळेच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड प्राजक्ता शिंदे यांनी काम पहिले.
सावंतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.२८८/५०२३ लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७ अ अन्वये अटकेत असलेल्या सागर खंडागळे याला जामीन मिळावा या करिता मा.विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन त्याची रक्कम रुपये ५० हजारच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश १ तथा मा.विशेष न्यायधीश सिंधुदुर्ग श्रीम. सानिका जोशी यांनी दिले.
तक्रारदार सिद्धांत परब यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग रायगड कँम्प सावंतवाडी यांचेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे आपल्याकडे दीड लाख रुपयांची लाच मागणी करत असलेबाबत १२ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सागर खंडागळे याला या रक्कमेपैकी एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने रंगेहाथ पकडून अटक केलेली होती.
या प्रकरणी सागर खंडागळेला जामीन मिळावा या करिता मा.विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन सागर खंडागळे याला विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.