वैभववाडी भाजपा कडून महाविकास आघाडीच्या खोटारडेपणाचा जाहीर निषेध

कंत्राटी भरतीचा निर्णय हा मविआ सरकारचाच – नासीर काझी

वैभववाडी | प्रतिनिधी : कंत्राटी भरतीचा निर्णय युती सरकारने घेतला असे विरोधकांकडून भासवले जात आहे. परंतु ख-या अर्थाने तो निर्णय महाविकास आघाडीच्या काळातच झाला आहे. कंत्राटी भरतीचे पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांचेच आहे. असा आरोप करत महाविकास आघाडीच्या खोटारडेपणाचा जाहीर निषेध करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी म्हटले आहे.

खोटं बोल पण रेटून बोल या वृत्तीने महाविकास आघाडी वागत आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय हा युती सरकारच्या काळातील असे भासवून युवकांची दिशाभूल महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. राज्यातील वातावरण सरकार विरोधात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटी भरती चा निर्णय रद्द करण्याचे धाडसी पाऊल टाकले आहे.

प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना महाविकास आघाडीच्या सरकारने मागविल्या होत्या. बाह्य यंत्रणेमार्फत गट क व गट ड संवर्गातील पदे भरण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत निविदा सन 2020 मध्ये काढण्यात आली होती. 15 जुन 2020, 17 जुलै 2020, 27 सप्टेंबर 2010, फेब्रुवारी 2013 रोजी देखील कंत्राटी भरतीचे परिपत्रक काढण्यात आले होते. तसेच 12 मे 2021 रोजी देखील बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी एजन्सी नियुक्तीचे पत्र काढण्यात आले होते.

मात्र महाविकास आघाडीचे नेते कंत्राटी भरतीचे खापर भाजपवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचा डाव हाणून पाडला जाईल. कंत्राटी चे खरे पाप तत्कालीन सरकारने केले आहे. मविआ च्या खोटारडेपणाचा भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करत आहे असे पत्रकामध्ये नासीर काझी यांनी म्हटले आहे.