शिक्षिका लीना नाईक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केला सत्कार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ला शाळा नंबर ४ येथे शिक्षक पालक यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन उपाध्यक्ष सौ. प्रज्ञा परब यांच्या हस्ते करण्यात आले, या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका लीना नाईक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेतील या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सौ. नम्रता कुबल, माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, सौ. अस्मिता राऊळ, माजी नगरसेविका कृतिका कुबल, सौ. योगिता लोकरे, मुख्याध्यापिका संद्या बेहरे, शिक्षक संतोष परब, बोडके सर, पालक सौ. जाधव, सौ. देसाई, अंगणवाडी सेविका आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
स्वराज्य मिळवण्यासाठी जसा जिजाऊंचा हात होता तसेच आपणही आपल्या आई वडिलांचे नाव होण्यासाठी त्यांच्या कष्टांचे चीज होण्यासाठी प्रयत्न करावेत. राजमाता जिजाबाई यांनी केवळ शिवबांनाच घडवले नाही तर असंख्य महिलांनाही प्रेरणा दिली. आजही अनेक महिला आई म्हणून मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना दिसतात, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर यांनी केले. दरम्यान वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या वतीने दर वर्षी शिक्षक शिक्षिका पुरस्कार’ देण्यात येतो. यावेळी वेंगुर्ले शाळा नंबर ४ च्या शिक्षिका लीना नाईक यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे पालक व शाळेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.













