देवगड मधील मराठा बांधवांची आरक्षण संदर्भात भूमिका जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभागवार दौरे करणार व त्यानंतरच देवगड तालुका मराठा समाज आपली भूमिका जाहीर करणार अशी माहिती तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी दिली. देवगड तालुका मराठा समाजाची बैठक दिनांक २२ ऑक्टोबर रोजी उमाबाई बर्वे लायब्ररी देवगड येथे पार पडली. यावेळी अध्यक्ष संदीप साटम, अविनाश सावंत, बंटी कदम, अजित राणे, सुधीर तांबे, दया पाटील, किसन सूर्यवंशी, संजीव राऊत, लल्ला पाटील, संकेत लब्दे, संजय धुरी, श्री.कदम, प्रकाश सावंत, श्री.अदम, उमेश कनेरकर, तुषार पाळेकर, कमलाकर लाड, प्रदीप सावंत, श्री. चव्हाण, पंकज दुखंडे, राहुल भुजबळ, केदार सावंत आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा मुद्दा गाजत असून अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. तसेच अनेक अभ्यासक वेगवेगळी मते व्यक्त करत असल्याने मराठा बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
यासाठी देवगड तालुका मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी दिनांक २५ ऑक्टोबर पासून मराठा समाजाचे पदाधिकारी गावोगावी जाऊन बैठका घेऊन मराठा बांधव यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आरक्षण याच सोबतच वधू वर सूचक मेळावा संदर्भातील माहिती देणे, विद्यार्थ्यांच्या स्पर्धापरीक्षां विषयी माहिती देणे, विधवा व निराधार भगिनींसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच त्यांना इतर मार्गदर्शन करणे याशिवाय शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देणे असे विषय सभेत मांडण्यात येणार आहेत. याची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी शिरगाव येथून होणार असून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.