खेड(प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हयाची कुलस्वामीनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्री काळकाई देवीला नवरात्रौत्सव व शिमगा उत्सवामध्ये शासकीय (पोलीस) सलामी देण्यात आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी याबाबत मुख्यमंत्री सचिवालयात पाठपुरावा केला होता. यावर्षी प्रथमच भरणे येथील श्री काळकाई देवीला नवरात्रौत्सवाच्या अखेरीस दसरा कार्यक्रमात उद्या मंगळवार (२४) रोजी पोलिस पथका कडून शासकीय सलामी देण्यात येणार आहे. मुंबई-गोवामहामार्गावरील भरणे येथील श्री देवी काळकाईचे मंदिर आहे. काळधर्म निवारणारी ती श्री देवी काळकाई असे भक्तगणांची श्रद्धा आहे.
राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान, भक्तांच्या हाकेला धावणारी,नवसाला पावणारी व माहेरवाशिणींची पाठराखीण असलेल्या आदिमाया श्री देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवास २६ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला असून मंगळवारी दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रथमच पोलिस प्रशासनाकडून मानाची सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजता श्री काळकाई देवी मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन श्री काळकाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव सुजित शिंदे यांनी केले आहे.