महेश सारंग वाढदिवस विशेष
आईच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करीत स्वकतृत्वाच्या जोरावर समाजकारण, राजकारण व सहकार या तिन्ही क्षेत्रांत यशस्वी झालेल्या महेश सारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. उपशाखाप्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती ते जिल्हा बँक संचालक तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष ते जिल्हा सरचिटणीस अशा सर्व पदांना न्याय देत संघटनात्मक पातळीवर आपला ठसा उमटवून प्रदेश नेतृत्वाची कौतुकाची थाप त्यांनी मिळविली. असे कार्यसम्राट नेतृत्व असलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा आढावा ..
महेश सारंग यांचा जन्म कोलगांव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील. इतर सामान्य मुलांप्रमाणेच त्यांचेही बालपण. मात्र, राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती कै.वृंदा सारंग या त्यांच्या मातोश्री. वृंदा सारंग यांनी शिवसेनेच्या तिकिटावर कोलगांव पंचायत समिती प्रभागाची निवडणूक लढवली व त्या निवडूनही आल्या. यावेळी महेश नुकताच राजकारणात सक्रिय होत होता. कोलगावच्या शिवसेना शाखेचा उपशाखाप्रमुख म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवली व वयाच्या केवळ २१ व्या वर्षी कोलगांव सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. यासह सर्वात कमी वयात कोलगांव सरपंच पदाचा मान महेश यांनी मिळवला.
याच दरम्यान त्याची आई वृंदा सारंग यांना पंचायत समितीच्या सभापतीपदाचा बहुमान मिळाला. आईच्या पदाच्या माध्यमातून महेश सारंग यांनी आपल्या कोलगांव गावासह मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. तत्कालीन खासदार सुरेश प्रभू, आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातूनही अनेक विकासकामे मार्गी लावली. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अनेक योजना राबविल्या. वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना पूढील निवडणूकीत कारिवडे पंचायत समिती प्रभागाची उमेदवारी देण्यात आली. तर याच वेळी त्यांच्या आई वृंदा सारंग यांना कोलगांव जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी दिली. एकाच वेळी दोन्ही निवडणूकांची तसेच कोलगांव पंचायत समितीची ही जबाबदारी असताना देखील महेश सारंग यांनी या तिन्ही जागांवर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्वयश प्राप्त केले.
दरम्यानच्या काळात महेश सारंग यांच्याकडे पक्षाने उपसभापती पदाचा कार्यभार सोपविला. या कार्यकालात महेश सारंग यांनी विकासकामांचा धडाकाच लावला. अनेक विकास योजना त्यांनी मार्गी लावल्या. घरकूल आवास योजनेतून मतदारसंघात एक हजाराहून अधिक घरकूले मंजूर केली. गावागावांत व वाडी वस्तीवर रस्ते, नंद्यांवर बंधारे, साकव, पूल यासारखी कामे पूर्ण केली.
मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना झालेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी भाजप नेते मा. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी तालुक्यात भाजप पक्ष अगदीच नगण्य होता. याच वेळी पक्ष नेतत्वाने त्यांच्यावर अखंड सावंतवाडी तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. याच वेळी त्यांच्या संघटन कौशल्याचा खऱ्या अर्थाने कस लागला. समोर एका बाजूने काँग्रेसचे तगडे आव्हान तर दुसरीकडे सावंतवाडी विधान सभेचे आमदार दिपक केसरकर यांच्या पक्षाशी लढत असूनही त्यांनी गावांगावात जाऊन भाजप पक्ष संघटन गठीत करून भाजपा पक्षाचा पाया मजबूत केला. अनेक गावांत बूथ कमिटी स्थापन करून पक्षाची मुहर्तमेढ रोवली व संघटना बांधली.
भाजपकडे त्या काळात केवळ बांदा ही एकमेव ग्रामपंचायत असताना त्यावेळी झालेल्या निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यात ५० पैकी निव्वळ भाजप पक्षाच्या तब्बल २४ ग्रामपंचायती निवडून आणून २४ सरपंच तर २७ ग्रामपंचायतवर उपसरपंच बसवले.
यशाने हुरळून न जाता व पराभवाने खचून न जाता महेशने नेहमीच काम करण्यावर भर दिला. त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर झालेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १३ पैकी ९ ग्रामपंचयातींवर भाजपचा झेंडा फडकवला. यात महेशचे नक्कीच फार मोठे योगदान होते. याचवेळी त्यांचे होमपीच असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतवर महेश सारंग यांच्या नेतृत्वात निर्विवाद यश प्राप्त केले. त्यांचे बंधू दिनेश हे विद्यमान उपसरपंच असून ते देखील कोलगावच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत.
पुढे २०१९ साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपवासी झाल्यानंतर पूढे झालेल्या विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी तालुक्यातून भाजपला ३१ हजार मते मिळवून दिली. केवळ ३ वर्षांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनात्मक पातळीवर काम करीत भाजपचे कमळ घरोघरी पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. यानंतर भाजपच्या नवीन जिल्हा कार्यकारणीत त्यांचा सहभाग झाला. राजन तेली जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याच्या पातळीवर काम करताना जिल्ह्यातील ९१६ बुथवर संपूर्ण बुथरचना करून वरिष्ठांची वाहवा मिळविली. त्यांच्या या कार्याची प्रदेश भाजपनेही दखल घेत त्यांचे कौतुक केले.
संघटनात्मक कामाला २४ तास वाहून घेत महेश सारंग यांनी भारतीय जनता पार्टी गावागावात व शेवटच्या बूथ पर्यंत नेण्याचे काम केले. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० प्रसंगी १२ – १२ वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले. भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे, केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या अनेक योजना तळागाळातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या योजनांचाही सर्वसामान्यांना लाभ मिळवून दिला. अलिकडे प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली. यावेळीही घर चलो अभियान, भाजप सुपर वॉरीयर्स यासारखी पक्षाची ध्येय धोरणे त्यांनी संपूर्ण मेहनतीने राबविली. त्यांनी सावंतवाडी मतदार संघाच्या संपूर्ण माहितीच्या केलेल्या पुस्तिकेचे भाजप नेते आमदार नितेश राणे व अन्य नेत्यांनी कौतुक करीत ते प्रेरणादायी असल्याचे आवर्जून उल्लेख केला.
मध्यंतरीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्याच आग्रहाखातर महेश सारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांच्या समोर सहकारातील गाढे अभ्यासक व तत्कालीन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम के गावडे यांच्यासारख्या सहकारातील प्रगल्भ नेतृत्वाचे तगडे आव्हान असतानाही महेश सारंग यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला लढवित जिल्हा बँक निवडणूकीत नेत्रदीपक यश प्राप्त केले.
सहकारात त्यांना तशी रुची नव्हती. मात्र, गावपातळीवर त्यांनी सहकार रुजविला होता. कोलगाव दुग्ध उत्पादक सहकार संस्था मर्यादित कोलगाव संस्थेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष या नात्याने कोलगांव पंचक्रोशीतील ३०० ते ४०० शेतकर्यांना शेतीपूरक व्यवसाय प्राप्त करून देत गोकुळच्या माध्यमातून प्रतिदिवशी ७०० ते ८०० लिटर दूध संकलन करण्याचे काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकर्यांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिले. तसेच त्यांच्या उत्पादनाला गोकुळ डेअरीच्या रुपाने हक्काची बाजारपेठ देखील मिळवून दिली. दुग्ध सोसायटी बरोबरच कोलगांव विकास सोसायटी गेली दहा वर्षे ताब्यात ठेवत शेतकऱ्यांना अनेक लाभाच्या योजना मिळवून दिल्या. तसेच कर्ज पुरवठा करून शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये सहकार्य केले. अलिकडेच झालेल्या सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत पारंपारीक नेतृत्वाला शह देत एकतर्फी विजय मिळवून देण्यात महेश सारंग यांचा मोलाचा वाटा होता.
सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला तसेच बेरोजगार युवक यांना कर्ज पुरवठा करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महेश सारंग प्रयत्न करीत आहेत. जिल्हा बँके सोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविण्यासाठी
योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम ते करीत आहेत. तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकण विभागातील इतर मागासवर्गीय समाज घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
या सर्व योजनांच्या माध्यमातून कार्य करीत असताना व जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करीन असतानाच विशेष करून सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा हक्काचा आमदार निवडून आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे. संघटनात्मक पातळीवर एक खंदा शिलेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या महेश सारंग यांना त्यांच्या आगामी जीवनात नक्कीच मोठे यश मिळेल यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस प्रहार व प्रहार डिजीटलच्या हार्दिक शुभेच्छा !