राजापूरात भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम

राजापूर (वार्ताहर): भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी राजापूर नगर परिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. सुमारे चार दिवस चालणार्‍या या मोहिमेचा आज शुभारंभ झाला असून मोकाट आणि झुंडीने फिरणार्‍या या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या संस्थेचे व्यवस्थापक, दोन तज्ञ डॉक्टरांसह नऊ जणांचे पथक शहरामध्ये कार्यरत आहे. या पथकाने पहिल्या दिवशी सोळा कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण केले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, आरोग्य विभागातील लिपीक प्रसाद महाडीक आदींच्या मार्गदर्शनाखाली भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहिम शहरामध्ये राबविली जात आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळणार असून त्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत होती. शहर आणि लगतच्या परिसरामध्ये कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असताना दिसत होत्या. वाहन चालकांची भटक्या कुंत्र्यांकडून अनेकवेळा पाठलाग केला जातो. यामुळे काही अपघातही झाले आहेत. यामुळे पादचारी नागरीक, वाहनचालक यांच्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत असते. या भटक्या कुत्र्यांच्या समस्येपासून शहरवासीयांची सुटका करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी सुमारे दोन-तीन वर्षापूर्वी तर, मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी एप्रिल महिन्यात नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम राबविली होती. त्यामुळे त्यानंतर काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काहीसा कमी झाला होता. त्यानंतर, गेल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे.

झुंडीने फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांची लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात होती. त्याची दखल घेवून नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहिम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. यामध्ये व्यवस्थापक विजय पाटील, डॉ. अमित गुप्ता, डॉ. मयंक नामदेव आणि त्यांचे सहकारी शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करत आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी 16 कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.