अंमली पदार्थांच्या विळख्यात कोकण…!

माझे कोकण/ संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अंमली पदार्थ सेवन करणारे तरूण याच्या आहारी गेल्याचे चित्र स्पष्ट असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही याचे लोण पोहचले आहेत. त्याची कारण कोणतीही असोत. परंतु अंमली पदार्थ सेवनाच्या नादी लागलेली एक पिढी यात पूर्ण बरबाद होऊन लागली आहे. अंमलीपदार्थांचा हा विषय फार गंभिर आहे. यामुळे हा काही राजकिय इश्यू नाही. नाशिकला ललित पाटीलला पकडल्यानंतर अंमलीपदार्थ विक्री हा विषय चर्चेला आला असला तरीही अंमली पदार्थ विक्री करणारी यंत्रणा याची माहिती स्थानिक पोलिसांना निश्चित असते. पोलिस यंत्रणा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यवस्थेबद्दल काहीच माहिती नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री व्यवस्था पूर्णपणे थांबवायची असेल तर त्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागेल. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुळात या विषयात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक यांनी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. पंधरा दिवसापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट झालेली त्यावेळी सहाजिकच कोकणातील अंमली पदार्थ सेवनाचा आणि त्यात मोठ्याप्रमाणावर तरूणाई कशी गुंतली हा विषय चर्चेला आला. जेव्हा अंमलीपदार्थ सेवन करणारी तरूणपिढी कशी गुंतत चाललीय हे समोर येत असल्याने कोकणातील पोलिस प्रमुखही अस्वस्थ आहेत. म्हणूनच कोकणात पोलिसांकडुन तरूण-तरूणींच्या जनजागृतीची मोहिम मोठ्याप्रमाणावर राबविली जात आहे. कारण हा सामाजिक प्रश्न आहे. समाजघटकातील सर्वांनीच याविषयात एकत्र येऊन हे थांबविले पाहिजे. रत्नागिरीचे एस.पी. धनंजय कुलकर्णी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल या दोन्ही पोलिस प्रमुखांनी हा विषय फार जिव्हाळयाने हाताळला जात आहे. कोकणच्या सीमेवर असलेल्या गोवा राज्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट आहे. गांजा विक्री तर कोकणात सर्वत्रच होत आहे. मोठ्याप्रमाणावर याची विक्री होते. अफू, कोकेण सारखे अंमली पदार्थ कोकणात गोवामार्गे येत आहेत. गोवा राज्याजवळ असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातून हा विक्री व्यवसाय तेजीत आहे. दोन महिन्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्रकिनारी चरसची पाकीट किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणावर आढळून आली. दोन वर्षापूर्वी सिंधुदुर्गातील किनाऱ्यावरही चरसची पाकीट आढळून आली होती. किनाऱ्यावर सापडणारी ही पाकीट कसली आहेत हेच सिंधुदुर्गातील पोलिसांना समजून आले नव्हते. यामुळे याविरोधात कारवाई करणे दूरच. या अंमलीपदार्थांच्याबाबतीत पोलिसही दुर्लक्ष करतात. याचे कारण अंमली पदार्थ विक्री व्यवस्थेचे गुन्हे एकदा दाखल झाले की हा राज्याचा विषय होत नाही तर केंद्रिय तपास यंत्रणाही यामध्ये तपास करीत असतात. यामुळे सहाजिकच ही नसती आपत कशाला मागे लावून घ्या यामुळेही सुरूवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु अंमलीपदार्थ सेवन करण्याने एक पिढीच त्यात बरबाद होऊ शकते. हे काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समजून आल्याने पोलिस यंत्रणा त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. खरंतर कोकणच्या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणावर चरसची पाकीट सापडल्यानंतर त्याची सखोल चौकशी होणे अपेक्षित होते. जर यासंदर्भाने चौकशी झाली असेल तर कोकणच्या किनारपट्टीवर ही चरसची पाकीट आली कुठून ? समुद्रमार्गाने अंमलीपदार्थ तस्करी होते का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून या प्रश्नांची उत्तर संबंधित यंत्रणेने शोधली पाहिजेत. आणि त्यासंबंधी कार्यवाहीही व्हायला हवी. एकिकडे तरूणाईचे प्रबोधन करून अंमली पदार्थ सेवनापासून त्याला रोखता येईलच असे नाही. त्यासाठी अंमलीपदार्थ बाजारात उपलब्धच होणार नाहीत यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. पोलिस यंत्रणेतील जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्याकडून तोडबाजी करून अंमलीपदार्थ बाजारातील विक्री व्यवस्थेला बळ दिले जाऊ शकते. गांजा विक्री प्रकरणातही हप्तेबाजीतून तो सुरू रहावा म्हणून खाकीवर्दीतील काहींकडुन प्रयत्न होत आहेत का ? त्याची चौकशी वरिष्ठ पोलिस यंत्रणेकडुन करण्याची आवश्यकता आहे. कोकणातही अंमलीपदार्थ विक्री व्यवस्था रोखणे ही बाबही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अंमलीपदार्थ येण्यासाठी आणि आणण्यासाठी एक ना अनेक मार्ग आहेत. गोव्यातून सिंधुदुर्गात आणि मग सिंधुदुर्गातून अखंड कोकणात अशी ही अंमली पदार्थांची दुर्गंधी सगळीकडे पोहचवली जाऊ शकते. तरूणाई याकडे एक ‘थ्रिल’ म्हणून ओढली जाते. नशेची एकदा सवय लागली की ती थांबवणे अवघड होते. शाळा, महाविद्यालयात दुर्दैवाने एकदा हे लोण पसरले तर ते कोकणातील घरांपर्यंत कधी जाऊन पोहचेल हे सांगताही येणार नाही. आणि मग ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होईल. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांनीही याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. हे केवळ शाळा, महाविद्यालयीन वेळेत फक्त आमची जबाबदारी असं शिक्षक, प्राध्यापकांनी म्हणून चालणार नाही. तर समाजातील जबाबदार घटक म्हणून हे रोखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे आणि समाज म्हणून आपलीही आहे. कोकणातील तरूणाईला ही किड लागू नये म्हणून सर्वांनीच सतर्क रहायला पाहिजे.
कोकणातील पोलिस प्रमुख अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घेतलेली भुमिका, रोखण्यासाठी चालविलेली प्रामाणिक प्रयत्न निश्चितच स्वागर्ताह आहेत. फक्त हे मिशन म्हणून सुरू रहायला पाहिजे. यामध्ये खाकीवर्दीतूनच अडथळे निर्माण होतील. परंतु ते अडथळे दूर करून जे अधिकारी अशा हप्तेबाजीत गुंतलेले असतील त्यांच्यावरही कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटीलची भ्रष्टाचारी सुरत समोरच आली आहे. या चांगल्या मिशनला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरही खात्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे.