रत्नागिरी :जिल्हा शासकीय रूग्णालयात डॉक्टरांच्या टीमने अडीच तासांच्या अथक परिश्रमाने मेंदुशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्यांच्या बाजूला, मानेला झालेल्या कॅन्सरवर अवघड शस्त्रक्रिया करून रूग्णाला जीवदान दिले. जिल्हा रूग्णालयाच्या २५ वर्षाच्या कालावधीत अशी अतिशय अवघड शस्त्रक्रिया प्रथमच झाली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात अपुरे मनुष्यबळ असतानाही हे रूग्णालय दिवसरात्र सामान्य रूग्णांना आरोग्यसेवा देत आहे. जिल्हाभरातून या रूग्णालयात येणार्या सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपलब्ध साधनसामुग्री आणि कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. या धडपडीतूनच एका रूग्णाच्या मानेला झालेल्या कर्करोगाची अतिशय अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात करण्यात आली.
रत्नागिरीतील या ३० वर्षांच्या तरूणाला मानेचा कॅन्सर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होत. मानेला ज्या ठिकाणी हा कॅन्सर दिसून आला तेथूनच मेंदूशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्या जातात. त्यामुळे यात जराही हलगर्जीपणा झाला असता, तर रूग्णाच्या जीवावर बेतले असते.