माजी नगरसेवक दीपक पाटकर व स्थानिक नागरिकांचे मदतकार्य
मालवण | प्रतिनिधी : मालवण देऊळवाडा येथील प्राथमिक शाळेकडील वळणाच्या रस्त्यालगत राहणाऱ्या संकेत सतीश आंब्रडकर यांच्या घराच्या पडवीला गुरुवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत पडवीचे छप्पर व आतील साहित्य जळून नुकसान झाले. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी घटनास्थळी धाव घेत नगरपालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण केल्यावर स्थानिक नागरिक व बंबच्या साहाय्याने आग विझविण्यात यश आले.
याबाबतची माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह सुहास वालावलकर, महेश गावकर, हरेश फणसेकर, अमित मराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक पाटकर यांनी तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण केल्यावर काही वेळातच बंब त्याठिकाणी पोहचल्यावर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. बंबावरील फायरमन वैभव वळंजू, वाहन चालक वसंत शिर्सेकर, सफाई कामगार सुमेध जाधव, स्वच्छता निरीक्षक शिवाजी शिंदे, मुकादम आनंद वळंजू यांनी आग विझवली.
या आगीत पडवीचे छप्पर जळाले असून इतर काही साहित्य जळून नुकसान झाले. तसेच नजीकच असणाऱ्या नारळ झाडाचे देखील नुकसान झाले.