मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध कलागुण दर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम “युवा जल्लोष” यावर्षी शनिवार दि.१४ जानेवारी २०२३ रोजी डॉ. आंबेडकर सभागृह मंडणगड येथे होणार आहे. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर “युवा जल्लोष” बद्दल माहिती देताना सांगितले की, महाविद्यालयाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात येत असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण प्रदर्शन मंडणगड शहर व परिसरातील नागरिकांसमोर करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मंडणगड तालुक्यातील शैक्षणिक, शासकीय सामाजिक, व्यापार, उद्योग व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत. मंडणगड परिसरातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आव्हान महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्रा. सायली घाडगे यांनी केले आहे