सावंतवाडीत राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न : खा. सुप्रिया सुळे

कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या कार्यालयाला भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. या ठिकाणी दोन वेळा मतदारांनी मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला. पुढे काय झाले याबाबत बोलणार नाही परंतु ज्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केले त्या जनतेचे आम्ही ऋणी आहोत व पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादी उभी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमचे विचार जनतेमध्ये घेऊन सर्वसामान्यांसाठी आम्ही काम करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सिधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असलेल्या खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांच्यासोबत संपर्क प्रमुख शेखर माने, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, कोकण विभागिय महीला अध्यक्षा अर्चना घारे – परब, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड. दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, बाब्या म्हापसेकर, हिदायतुल्ला खान, देवा टेमकर, याकुब शेख, सावली पाटकर, माया चिटणीस आदी उपस्थित होते.

रोजगार हा महत्वाचा आहेच पण कोकणात किंवा सिंधुदुर्गात प्रदूषणकारी प्रकल्प येत असतील तर आधी स्थानिक लोकांशी चर्चा झाली पाहिजे. लोकांना उध्वस्त करणारे प्रकल्प येथे होऊ नये यासाठी नेते मंडळींनीही पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरण पुरक उद्योग आणून येथील विकास व्हावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ड्रग्स हा विषय राजकीय नाही तो सामाजिक विषय आहे त्यामुळे यावर कुठलेही राजकारण न करता तो गांभीर्याने घेतला जावा. ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही सगळे नक्कीच सोबत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विशेष करून सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादीला अधिक ताकद देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच आगामी निवडणुका इंडिया तसेच महाविकास आघाडी म्हणूनच लढवू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.