Onion Price : कांद्याच्या दरात वाढ पण कांदा आहे कुठे? शेतकर्‍यांचं दुःख काही संपेना…

सामान्यांच्याही खिशाला कात्री

मुंबई : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना (Onion farmers) दिलासा देणारी एक बाब समोर आली होती, मात्र त्या बाबीमुळेही शेतकर्‍यांचा त्रास काही केल्या संपत नाही. मागच्या काही महिन्यांत टोमॅटोचे (Tomato) भाव खूप वाढल्यानंतर आता कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. कांद्याचा दर नेहमीपेक्षा बराच वाढला असून शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे आता फारच कमी कांदा शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचं दुःख अजूनही कायम आहे.

ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याचे भाव वाढतील या आशेने कांदे विकले. मात्र, आता भाव वाढल्यानंतर कांदेच शिल्लक राहिले नाहीत. जो माल उरला तो बर्‍यापैकी सडत आला आहे, त्यामुळे भाव मिळत असला तरी कांदे आणायचे कुठून या प्रश्नाने शेतकर्‍यांचा मनस्ताप वाढला आहे.

दरम्यान, कांद्याला सरासरी ४ हजार ८०० ते जास्तीत जास्त ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, विक्रीसाठी कांदा शिल्लक नाही. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक पूर्णपणे घटली आहे. तसेच देशांतर्गत पुरवठा होत नसल्याने तिकडे मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे. उन्हाळी कांदा संपून लाल कांद्याला बाजारात यायला अजून एक महिना अवकाश असल्याने पुढील काही दिवस कांद्याचे दर हे चढेच राहणार आहेत.

सामान्यांच्या खिशाला कात्री

आठवडाभरापूर्वी कांदा ३० ते ४० रुपयांनी मिळत असताना दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे ५० ते ६० रुपये किलो इतके वाढले आहेत. आठवडाभरात कांद्याच्या दरात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. पुढील काही दिवस कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.