कविसंमेलनात एकूण २० काव्यप्रेमीनी घेतला सहभाग
वेंगुर्ले : दाजी नाईक : शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात आयोजित केलेल्या कोजागरी कविसंमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. याचे आयोजन खटखटे ग्रंथालय, शिरोडा आणि आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. कोजागरीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या कविसंमेलनात एकूण २० काव्यप्रेमीनी सहभाग घेतला.
सुरवातीला ग्रंथपाल अर्चना लोखंडे यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या काव्यमैफिलीत खुशी परब, सानिया शेख, रोहित आसोलकर, श्रीपल्ली लोखंडे, दिपराज परब आणि दिक्षा आसोलकर या विद्यार्थ्यांनी प्रथम कविता सादर केल्या; तर उत्तरार्धात सुनिधी मराठे, भालचंद्र दिक्षित, उर्जित परब, सोमा गावडे, स्नेहा नारींगणेकर, विशाल उगवेकर, संकेत येरागी, मिहीर नाईक, प्राची पालयेकर आणि विनय सौदागर यानी स्वरचित कविता सादर केल्या. राजेश वैज यानी कवी ग्रेस यांची कविता गाऊन सादर केली, तर श्रीमती लोखंडे यांनी कुसुमाग्रजांची ताठ कणा ही कविता सादर केली.
कविसंमेलनाच्या मध्यंतरात खटखटे ग्रंथालयाची माहिती सांगणारा स्लाईड शो दाखविण्यात आला. त्यासाठीची तांत्रिक बाजू साईश शारबिद्रे यांनी सांभाळली, तर निवेदन पत्रकार अनिल निखार्गे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ग्रंथालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ. श्रीराम दिक्षित यांच्या भैरवी गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, अनिल गावडे, उत्तम भागीत सर, मोहन जाधव सर, लक्ष्मीकांत कर्पे, दीपक करंडे, एकनाथ शेटकर, रेणूदास चौधरी, दिक्षा चौधरी, प्रकाश मिशाळ आदी अनेक काव्य रसिक उपस्थित होते. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन विनय सौदागर यांनी केले, तर आभार श्रीराम दिक्षित यानी मानले.