शिराळे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
वैभववाडी | प्रतिनिधी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळे गावची ओळख थंड हवेचे ठिकाण अशी आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला जाईल. पर्यटन वाढीसाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. शिराळे येथे बीएसएनएल टॉवर भूमिपूजन सोहळा तसेच रस्ता कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, कुमारी पाटील व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, उबाठा नेत्यांसारखी आम्ही विकासकामांची खोटी आश्वासने देत नाही. केवळ नारळ फोडून थांबत नाही. तर कामाचा शुभारंभ झाल्यानंतर सदर काम दर्जेदारपणे पूर्ण करण्याचीही जबाबदारी आम्ही घेतो. यापुढे निधीची चिंता नको. आता तुमचा आमदार सत्तेतील आमदार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपण गावचा विकास साधूया. पर्यटन मंत्र्यांची भेट घेऊन निधी उपलब्ध केला जाईल असे सांगितले. नवलराज काळे यांचे त्यांनी कौतुक केले. कामाचा पाठपुरावा करणारे काळें सारखे कार्यकर्ते गावागावात असले पाहिजेत असे सांगितले. नासीर काझी म्हणाले, शिराळे गावाला विविध योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. यापुढे नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची राहील असे सांगितले. प्रास्ताविक नवलराज काळे यांनी केले. गावात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने तसेच गावात बीएसएनएल चा नवीन टॉवर मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.