जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रांच्या लेकींचा अभियानाचा समारोप सोहळा संपन्न
अभियानादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण उत्साहात
खंडाळा : प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा पाया हा त्याच्या बालपणीच्या शिक्षणामध्ये घातला जातो. त्यामुळे लहानपणी मिळालेले शिक्षण हे कायमस्वरूपी प्रत्येकाच्या आयुष्याला दिशादर्शक देणारे असते. म्हणूनच याच वयामध्ये प्रत्येक मुलांना शालेय शिक्षणाच्या माध्यमातून पालक आणि शाळा यांनी एकमेकांच्या सहकार्याने त्यांच्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन रुजविणे अत्यावश्यक असल्याचे मत पंचायत समिती रत्नागिरीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेमध्ये महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या आदेशान्वये दिनांक ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ ते राष्ट्रमाता सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभिया – २०२३ या अभियानाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.ते पुढे म्हणाले की लहान वयामध्ये विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजाने त्यांच्यासाठी आदर्शवत कार्य घडवून आणणे गरजेचे आहे. कुठल्याही गोष्टींमध्ये श्रद्धा असावी मात्र तरी अंधश्रद्धा बाळगणे समाजासाठी घातक ठरू शकते. त्यासोबतच प्रत्येक पालकाने आपल्या घरामध्ये वा आपल्या आजूबाजूला जे – जे चांगलं आहे, ते – ते चांगले मुलांच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे असून मुलगा – मुलगी असा भेद न करता, मुली ह्या सुद्धा देशाच्या आधारस्तंभ ठरू शकतात याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. या सोबतच पालक आणि शाळेने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करावी अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच याप्रसंगी उपस्थित असणारे वाटद मिरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल पवार यांनीही आपल्या मनोगतातुन कवठेवाडी शाळा राबवीत असलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहितीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तर उपस्थितांपैकी सुवर्णा दिनेश धनावडे, वैशाली विजय कुर्टे, रेणुका प्रभाकर धोपट यांच्यासह गौरी संदीप धनवडे यांनीही राजमाता जिजाऊ आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आपल्या मनोगतातून माहिती सांगित उपस्थितांची मने जिंकली.
३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानानंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान माननीय गटविकास अधिकारी आणि प्रमुख उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. तर सन्मान महाराष्ट्रांच्या लेकींचा अभियानामध्ये शाळा परिसरातील कर्तुत्वत्वान महिलांचा सन्मान या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील मागील अनेक वर्षांच्या योगदानाची दखल घेत सुयश क्लासेस अकॅडमी खंडाळाच्या संचालिका सौ. रेणुका प्रभाकर थोपट व वाटद कवठेवाडी मधील सौ. वैशाली विजय कुर्टे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याच अभियानाचा भाग म्हणून आरोग्यवर्धिनी केंद्र वाटद यांच्या सहकार्याने विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम, पर्यवेक्षक तांबे, परिचारिका पूनम लाड, तांत्रिक सहाय्यक वृषाली शिंदे, सिएचओ रहाटे यांचे सहकार्य लाभले.या अभियानाच्या समारोप प्रसंगी विस्तार अधिकारी कांबळे साहेब, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर, वाटद मिरवणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. पी. प्रक्षाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप शिगवण, शिक्षणतज्ञ नारायण धनावडे, यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिला वर्गांची उपस्थिती लक्षणीय होती. राजमाता जिजाऊ आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांच्यासह वाडीतील विश्वनाथ शिर्के, प्रणव धनावडे, सुजाता लोहार, अक्षरा शिर्के, समीक्षा घवाळी, विघ्नेश कुर्टे, शामली धनावडे, आर्यन तांबटकर, राज धनावडे, नयन बारगुडे, सिद्धी कुर्टे, सोहम कुर्टे, यश आलीम, अथर्व तांबटकर, तेजस्वी धनावडे यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक गोविंद डुमनर यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे यांनी केले.












