आंबोली । प्रतिनिधी : हत्ती असलेल्या भागात जंगल फिरती करत असताना हत्तीनेच केलेल्या हल्ल्यात वनमजूर ठार झाल्याची दुदैर्वी घटना
आजरा घाटकरवाडी येथे घडली. प्रकाश गोविंद पाटील ( वय ५४ रा. गवसे, ता. आजरा ) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आंबोली व आजरा अशा भागात टस्कर हत्तीला सारखे पिटाळत असल्याने हत्ती बिथरल्याने हा प्रकार झाला असावा असा आरोप आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे. या टस्कराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी सरपंच पालेकर यांनी वेळोवेळी वनविभागाकडे केली होती.
सदरचा हत्ती काही महिन्यांपूर्वी आंबोली व आजरा परिसरात दाखल झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याचे वास्तव्य आंबोली भागात होते. त्यानंतर आजरा जंगल हद्दीत असताना घाटकरवाडीच्या जंगलात शनिवारी सकाळी ११ वाजण्यास सुमारास ही दुदैर्वी घटना घडली. दुपारी त्यांचा मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मयत वनमजूराला ‘वनशहीद ‘ दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिले.
शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून धनगरमोळा परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांकडून हत्ती असणाऱ्या भागाची जंगल फिरती मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत धनगरमोळा परिमंडळाचे वनपाल भरत निकम, वनरक्षक गुरुनाथ नावगेकर, दीपक कदम, प्रियंका पाटील, वनमजूर रमेश पाटील, आनंदा सावंत, बबन फर्नांडिस, गंगाराम कोकरे, जगन्नाथ कोकरे हे सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांकडून हाकाऱ्या देत जंगलात फिरती सुरू होती.
यावेळी अचानक मोठ्या गर्द झाडीतून हत्ती समोर आला. हत्तीला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली व वाट मिळेल त्या दिशेने सर्वजण पळू लागले. यावेळी हत्तीच्या तावडीत प्रकाश पाटील सापडले. हत्तीने पाटील यांना सोंडेत घेऊन गरागर फिरविले व जमिनीवर दोनवेळा आपटले व त्या ठिकाणी मोठ्याने चित्कारला. त्यानंतर थोड्यावेळाने हत्ती त्याठिकाणाहून जंगलात निघून गेला. यानंतर भितीने पळून गेलेले वन कर्मचारी वनमजूर पाटील यांना शोधत मूळ ठिकाणी आले. मात्र, हत्तीच्या हल्ल्यात प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले.
नातेवाईकांचा प्रक्षोभ : रास्ता रोको
याबाबतची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी प्रकाश पाटील यांचा मृतदेह घाटकरवाडी येथे आणून रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्हा उपवनसंरक्षक जी ग्रुरुप्रसाद, वनक्षेत्रपाल स्मिता डाके, नंदकुमार भोसले, प्रशांत आवळे, वनपाल वनमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा डेळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली व नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
अखेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा गवसे ( ता. आजरा ) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनमजूर प्रकाश पाटील हे वनविभागात १९९४ पासून रोजंदारीवरती कामाला होते. ते २०१२ मध्ये सेवेत कायम झाले होते. त्यांचे पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
हत्तीचा फुटबॉल झाल्यानेच हा दूर्दैर्वी प्रकार : आंबोली सरपंच सावित्री पालेकर
आजरा येथे हत्तीच्या हल्ल्यात वन मजूराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरानंतर आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही जिल्ह्याच्या वनविभागाकडून हत्तींचा फुटबॉल झाला आहे. दोन्ही बाजूने हत्तींना दुसऱ्या सिमेत हाकलण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडत आहेत. आता तरी हत्तींचा तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.