प्रार्थनास्थळे व कार्यक्रमांतून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी : अन्यथा कारवाई

Google search engine
Google search engine

शांतता समिती बैठकीत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे निर्देश

सावंतवाडी । प्रतिनिधी : सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे किंवा विविध कार्यक्रमाच्या वेळी सर्वोच्च न्यायालय व शासनाने निर्देश केल्याप्रमाणे ध्वनी प्रक्षेपण करण्यात यावे. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे निर्देश पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिले.
सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी ध्वनी प्रक्षेपण करताना त्रास होऊ नये याची खबरदारी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे, विविध कार्यक्रम करताना घेतली जावी. त्याबाबत कोणत्याही तक्रारी होऊ नये म्हणून खबरदारी ही घेण्यात यावी असे निर्देश दिले.
सर्वोच्च न्यायालय व शासनाचे आदेश या पार्श्वभूमीवर वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांचे पालन केले जाते. त्यामुळे सर्व धर्मियांनी त्याचे पालन केले पाहिजे. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या दरम्यान तशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सर्व धर्मीय व शांतता समितीच्या सदस्यांनी याबाबत दक्षता घ्यावी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन कोणी तक्रार करत असेल तर त्याची शहानीशा पोलिसांनी करावी, असे आवाहन केले. तसेच शहरातील शाळा भरताना रस्त्यावर वाहतूक अडथळा निर्माण होतो याबाबत देखील शाळा व्यवस्थापनासोबत पोलिसांनी चर्चा करावी, अशी सूचना सदस्यांनी मांडली.
यावेळी शांतता समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,राजू बेग, गोविंद वाडकर, सौ.रेश्मा सावंत, ॲड नकुल पार्सेकर, सुरेश भोगटे, अभिमन्यू लोंढे, रवींद्र मडगावकर, हिदायतुल्ला खान, सौ. अफरोज राजगुरू, आगोस्तीन फर्नांडिस, रफिक मेमन, शब्बीर शेख, फारुख गनी, नदीन दुर्वेश, कबीर शेख, मोहदीन शेख, चाँद करोल, अल्ताफ मुल्ला व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.