भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित

सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांची कारवाई
गैरकृत्य करून कर्तव्यात कसूर केल्याने करवाई

कणकवली :
कणकवली वनपरीक्षेत्रांतर्गत भिरवंडे वनपाल म्हणून कार्यरत असलेले सत्यवान अनंत सुतार यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने वाहतूक पास देणे, वाहन क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेचा लाकूड वाहतूक पास देणे, तसेच ई-प्रणाली नुसार वाहतूक पास देतेवेळी त्यावर दुसऱ्याच वेक्तीचा फोटो अपलोड करणे. अशा प्रकारचे गंभीर गैरकृत्य करून कर्तव्यात कसूरप्रकरणी सुतार यांचेवर सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबतची तक्रार आम आदमी पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केली होती. माहिती अधिकाराच्या माहितीतून ही बाब उघड झाली होती. सत्यवान सुतार यांनी 72.25 घनमीटर क्षमतेच्या लाकडाचा वाहतूक पास 18 नोव्हेंबर 2022 रोजी पारित केला होता. मात्र वाहतूक करणार्‍या त्या वाहनाची तेवढी क्षमता नव्हती. वाहनाच्या वाहतूक क्षमतेच्या मर्यादेपेक्षा तिप्पट क्षमतेचा लाकूड वाहतूक पास त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे त्या पासवर वाहनाच्या फोटोऐवजी एका नामवंत सामाजिक कार्यकर्तीचा फोटो लावला होता. माहिती अधिकारात ही बाब उघड झाल्यानंतर आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी याबाबतची तक्रार केली होती. याप्रकरणी सत्यवान सुतार यांची खातेनिहाय चौकशी होवून ते दोषी आढळले होते. मात्र याप्रकरणी कारवाईस विलंब होत असल्याने विवेक ताम्हणकर यांनी आपण प्रधान वनसंरक्षक आणि मुख्य वनसंरक्षकांचे लक्ष वेधले होते. अखेर याप्रकरणी वनपाल सत्यवान सुतार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे सांगितले.
उपवनसंरक्षकांनी सत्यवान सुतार यांना निलंबित करताना निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय वनक्षेत्रपाल (प्रा.दोडामार्ग) हे असणार आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.