बाजीगर

मंथन : सुकृत खांडेकर : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दोन दसरा मेळावे झाले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा उठाव झाला आणि शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचा वेगळा दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. शिवाजी पार्क मैदान कुणाला? हा संघर्ष मुंबई महापालिका ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. अखेर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर व एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. यंदाही पुन्हा तोच पेच निर्माण होणार होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मैदान कुठले का असेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महत्त्वाचे आहेत, असा त्यांनी विचार केला आणि शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे, शिंदे यांच्या पक्षालाच शिवसेनेचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह दिले आहे. एकनाथ शिंदे व धनुष्य बाणाचे चित्र असलेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची हजारो पोस्टर्स व होर्डिंग मुंबईसह संपूर्ण राज्यात झळकली होती. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ‘आवाज कुणाचा?’ या प्रश्नाने मोठी उत्सुकता निर्माण केली होती. पण गर्दी, उत्साह, जोश पाहता एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आपण व आपला पक्षच आहे, हे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले.
उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत व पक्षप्रमुख आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत व पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. शिवसेनाप्रमुख हे एकच म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुख हे पद कोणीही घेऊ शकत नाही. ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाला गद्दार आणि मिंधे सरकार म्हणून हिणवणे आजही चालूच ठेवले आहे. पण आझाद मैदानावरील गर्दीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी गद्दार असते, तर त्यांच्या मेळाव्याला लाखो शिवसैनिक कसे जमले असते? आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने आले होते, त्यांच्यात जल्लोष दिसला. आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत, अशी भावना दिसली. एकनाथ शिंदे हे राज्यात अनेक वर्षे मंत्री होते. उद्धव ठाकरे यांना हटवून ते मुख्यमंत्री झाले, ही खरी उबाठा सेनेची पोटदुखी आहे. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला सव्वा वर्षे पूर्ण झाली. पण त्यांच्यात माज, मस्ती किंवा अहंकार कधी दिसला नाही. ते सदैव नम्रतेने बोलतात, मनावर मोठा संयम ठेवतात, नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. रस्त्यावरचा कार्यकर्ता, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार नसानसांत मुरलेला नेता, धर्मवीर आनंद दीघे यांच्या संस्कारात वाढलेला शिवसैनिक ही त्यांची आजही ओळख आहे. रोज १८ तास काम करणारा हा नेता आहे. सतत लोकांच्या गर्दीने वेढलेला हा जनमान्य नेता आहे. कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री हे घरी बसून फेसबुक लाइव्हवरून जनतेला सल्ले देत होते, त्याच वेळी एकनाथ शिंदे अंगावर पीपीए किट चढवून स्वत:चा जीव धोक्यात घालून इस्पितळांत व रस्त्यावर फिरत होते. धर्मवीर आनंद दिघे हे लक्षावधी शिवसैनिकांचा जीव की प्राण होते. पण झालेल्या अपघातानंतर त्यांना भेटायला ठाकरे ठाण्याला आले नव्हते. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे-पालघरमध्ये शिवसेना घरोघरी पोहोचवली. पण त्यांच्या निधनानंतरही ठाकरे अंत्यदर्शनला आले नव्हते. एवढेच काय त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायलाही, तेव्हा फिरकले नव्हते. ही उदाहरणे स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिली, तेव्हा अनेकांना धक्का बसला. जेव्हा धर्मवीरांच्या निधनानंतर आपण मातोश्रीवर गेलो, तेव्हा आपल्याला विचारले, “आनंद दिघेंची प्रॉप्रर्टी कुठे-कुठे आहे?” असा शिंदे यांनी गौप्यस्फोट करताच, आझाद मैदानावर संतापाची प्रतिक्रिया उमटली. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मोदी द्वेष आणि शिंदे मत्सर दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा महाराष्ट्रात येतात व त्याने शिंदे- फडणवीसांचे महत्त्व वाढते, हे उबाठा सेनेला आवडत नसावे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोहन जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणास्त्र बाहेर काढले आहे. मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी जाहीर केली आहे. काही ठिकाणी नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या वाहनांची मोडतोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. बंदही पाळले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य वेळीच ओळखले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. आझाद मैदानावरील मेळाव्यात व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होऊन शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला, यात त्यांची प्रामाणिक भावना दिसून आली. ‘शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत लढेन’, असेही वचन एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरून मराठा समाजाला दिले. यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दांत जनतेला आश्वासन दिले नव्हते. शिंदे यांच्या भाषणात मोठी तळमळ दिसून आली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
सर्व देशालाच लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही दसरा मेळाव्यांत भाषणे झाली. उद्धव ठाकरेंना राहुल गांधी व शरद पवार यांना बरोबर घेऊन निवडणुका लढवायच्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांना भाजपाला बरोबर घेऊन मैदानात उतरायचे आहे. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना ज्यांना गाडा म्हटले, त्या काँग्रेसशी उबाठा सेनेने युती केली आहे. समाजवादी विचारांचे गट-तट आता उबाठा सेनेला जवळचे वाटू लागले आहेत. वंचित आघाडीबरोबरही उबाठा सेनेची उठबस चालूच आहे. सत्ता गेल्यामुळे उबाठा सेना सैरभैर झाली आहे.
आझाद मैदानावरील मेळाव्यात रामदास कदम यांच्यापासून अनेकांची सडेतोड भाषणे झाली. पण ज्योती वाघमारे ही नवीन रणरागिणी प्रकाशझोतात आली. त्यांच्या आवेशपूर्ण भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आपल्या भाषणात उबाठा सेनेच्या सुषमा अंधारे यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलाच, पण शिंदे व ठाकरे यांची तुलना करून शिंदे हेच कसे मर्द आहेत, हे ठणकावून सांगितले. ज्योती वाघमारे यांनी मेळावा गाजवला. ‘ज्योती बने ज्वाला’ म्हणजे काय, याचे दर्शन ज्योती वाघमारे यांच्या भाषणातून घडले. “ठाकरे यांना गुलामी करायची, तर ठाकरे आडनाव न लावता, वाकरे आडनाव लावावे” असा त्यांनी ‘प्रहार’ केला. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांवर अपमानास्पद शब्दांत टीका केली, ज्यांनी हिंदू देवदेवतांची आर्वाच्च शब्दांत निर्भर्त्सना केली, त्या उबाठा सेनेचा चेहरा कसा बनू शकतात? असा त्यांनी थेट प्रश्न विचारला.
नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मीना कांबळी, भावना गवळी, यामिनी जाधव, शीतल म्हात्रे अशा कर्तृत्ववान व स्वत:च्या कर्तबगारीवर जनमानसांत स्थान निर्माण केलेल्या महिला नेत्या या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. त्यांना पक्षाने महत्त्वाची पदे देऊन सन्मान केला आहे.
दोन वेळा कोविडने घेरलेले असतानाही एक दिवसही सुट्टी न घेणारे, हाताचे सलाईन काढल्यानंतर थरथरत्या हाताने वैद्यकीय मदतीच्या अर्जावर पहिली स्वाक्षरी करणारे, सव्वा वर्षांत सव्वाशे कोटी रुपये वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजूंना मदत देणारे, गणपती दसरा दिवाळीला लक्षावधी गरिबांच्या घरी आनंदाचा शिधा पोहोचविणारे, राज्यात महिलांना एसटी बसमधून ५० टक्के सवलत देणारे, वयाची ७५ पूर्ण केलेल्यांना एसटी बस प्रवासाची मोफत सुविधा देणारे, कोसळत्या पावसात ईर्शाळवाडीचा गड चढून जाऊन तेथील लोकांना दिलासा देणारे, उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणारे, मुंबई व महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शेकडो मोफत दवाखाने सुरू करणारे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ‘सर्वसामान्य जनतेचा आधार’ अशी बनली आहे. म्हणूनच ते ‘बाजीगर’ ठरले आहेत…
[email protected]
[email protected]