सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी अभिमन्यू लोंढे व गुरूनाथ पेडणेकर यांची निवड

Google search engine
Google search engine

एकमत न झाल्याने निवडणूक : ९ विरुद्ध ६ मतांनी निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे व गुरूनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली. दोन तज्ञ संचालक पदासाठी एकूण पाच अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यावर एकमत न झाल्याने पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ९ विसद्ध ६ मतांनी अभिमन्यू लोंढे व गुरुनाथ पेडणेकर यांची तज्ञ संचालक पदासाठी निवड झाली. तालुका खरेदी विक्री संघावर भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे १५ सदस्य आहेत. मात्र, आजच्या निवड प्रक्रियेत झालेल्या मतदानावेळी भाजपचे वर्चस्व दिसून आले.
दरम्यान, नवनिर्वाचित तज्ञ संचालकांचे
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून संस्थाचा विकास करताना शेतकऱ्यांचे हित जोपासले जाणार आहे . संघाला साजेशे काम करून सावंतवाडी खरेदी विक्री संघाचा आलेख वाढविण्यासाठी नव्या संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, जास्तीत जास्त शेतकरी बागायतदारांना फायदा मिळवून द्यावा, असे आवाहन यावेळ तेली यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रविण देसाई, दत्ताराम कोळमेकर, ज्ञानेश परब, प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, भाई राऊळ, आत्माराम गावडे, भगवान जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अन्य पदाधिकार्‍यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वच संचालक मंडळाकडुन आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तत्पूर्वी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष राजन रेडकर, संचालक आनारोजीन लोबो, शशिकांत गावडे, प्रमोद सावंत, प्रवीण देसाई, प्रभाकर राऊळ, रश्मी निर्गुण, नारायण हिराप, विनायक राऊळ, आत्माराम गावडे, दत्ताराम कोळमेकर, दत्ताराम हरमलकर, ज्ञानेश परब, भगवान जाधव आदी उपस्थित होते.

तज्ञ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन काम करणार : प्रमोद गावडे
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवड प्रक्रियेत झालेल्या निवडणुकीविषयी बोलताना चेअरमन प्रमोद गावडे म्हणाले, सहकारात अशाप्रकारे मतमतांतरे होत असतात. वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही निवड प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला मात्र एकमत न झाल्याने निवडणूक झाली.मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नसून यापुढेही सर्वजण पूर्वीप्रमाणेच एकत्रितपणे काम करणार आहोत. निवड झालेल्या दोन्ही तज्ञ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही प्रमोद गावडे यांनी स्पष्ट केले.