ST Bus : एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा! पगारातून दोन हजार रुपये कपातीचा निर्णय मागे

कर्मचाऱ्यांच्या एकसंघ विरोधाचा परिणाम

नाशिक : एस टी बँकेत रुपया निधीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून २ हजार रुपये कापण्याचा निर्णय एस टी बँकेकडून घेण्यात आलेला होता. परंतु हा निर्णय अखेर मागे घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांचा विरोध पाहता एस टी.को. ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने काल हा निर्णय मागे घेतला आहे. बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक बँक सभासदांच्या मासिक वेतनातून काही ठरवलेली रक्कम कापण्यात येते. ती जमा केलेली रक्कम ‘रुपया ठेव निधी’ या योजनेमध्ये समाविष्ट केली जाते. जेवढी रक्कम होईल त्यावर कर्मचाऱ्यांना वार्षिक व्याज दिले जाते.सध्याच्या पगारातून कर्मचाऱ्यांची १०० रुपयापासून ५०० आणि ५०० ते १००० अशी रक्कम कापण्यात येत होती. मात्र, पुढील वेतनामधून थेट २००० रुपये कपात करण्यात येणार होती. ती आता रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.