आबलोली : श्री दिपलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित लि. सातारा यांच्या वतीने बाळासाहेब लबडे यांची कादंबरी: स्वरूप आणि चिकित्सा या विषयावरील परीसंवादाचे आयोजन नवीपेठ, पत्रकार भवन, पुणे येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरिष चिटणिस (अध्यक्ष- दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था सातारा) यांनी केले.
बाळासाहेब लबडे यांच्या तिनही कादंबऱ्यां आशय, विषय, शैली या दृष्टीने वेगळ्या लिहील्या आहेत. त्या इंग्रजीत गेल्या पाहिजेत त्यांची गुणवत्ता ही बुकर पर्यंत आहे.जागतिक दर्जाच्या त्या आहेत.त्यानंतर
निर्मितीप्रक्रिया भाष्य प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे
(कादंबरीकार ,कवी,गीतकार, गझलकार, समीक्षक, संपादक, अभ्यासक) यांनी केले.यात ते म्हणाले,”चार मुंग्यांच्या अस्तित्वाच्या निर्मितीप्रक्रियेची गोष्ट ‘ सांगणारी माझी “पिपिलिका मुक्तिधाम” ‘ ही २०१९ मध्ये ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली पहिली कादंबरी आहे .बऱ्याच जणांना “पिपिलिका” ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता . तशी विचारणा झाली . “पिपिलिका” हा संस्कृत शब्द आहे .त्याचा अर्थ मुंगी असा होतो .जुन्या काळापासून हा शब्द रूढ आहे .आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हे माहीत असेल की , अध्यात्मात जे मुक्तीचे मार्ग सांगितले आहेत . त्यात एक मार्ग “पिपिलिका” मार्ग सांगितला आहे .मुक्तीचे चार प्रकार आहेत . सलोकता , समीपता , सरूपता , सायुज्यता . संत ज्ञानेश्वर त्याआधी चक्रधरस्वामी ते संत तुकारामांपर्यंत अनेकांनी “पिपिलिका” मार्गाचे वर्णन केले आहे . त्यांच्या विवेचनावरूनच मला हे कादंबरीचे शीर्षक सुचले . संत तुकारामांनी आपल्या स्वतःविषयी “पिपिलिकाच्या जाती” म्हटले आहे , तर संत ज्ञानेश्वर यांनी समुद्राच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी ज्याची असते , स्वर्गीचा आवाज ज्याला ऐकू येतो आणि अशा मुंगीचे मनोगत ज्याला जाणता येते ती म्हणजे आई आणि अशा आईच्या हृदयाने परकाया प्रवेश करून मानवजातीतील जो तळ आहे तो तळ ढवळून काढावा आणि त्यांच्या जगण्याची दशा आणि दिशा मांडावी या हेतूने “पिपिलिका मुक्तिधाम” ही कादंबरी लिहिली आहे . त्यामुळे लेखकाकडे असावा लागतो , तो व्यापक मानवतावाद असे माझे मत आहे . त्यामुळे कोणत्याही धर्माचे केवळ भंजन करणे हा हेतू यामागे नाही. धर्माच्या विविध वाटा ही कादंबरी सांगत जाते .मानवी जगण्याच्या कल्पना ,तत्वज्ञान, धारणा, जीवनाविषयी असलेली अपार करुणा , दया , जिज्ञासा यामुळेच मला लिहावे वाटले “त्याबरोबरच त्यांनी इतर दोन कादंबऱ्यांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवली.
त्यानंतर कादंबरी भाष्य झाले “शेवटची लाओग्राफिया”या कादंबरीवर(अथर्व पब्लिकेशन, जळगाव.)श्री.लक्ष्मीकांत देशमुख
(ज्येष्ठ साहित्यिक,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)यांनी भाष्य केले. “बाळासाहेब लबडे हे प्रयोगशील कादंबरीकार आहेत हे त्यांच्या “पिपिलिका मुक्तीधाम” या पहिल्याच कादंबरीतून सिद्ध झाले आहे. ही प्रयोगशीलता कथन व कथ्य व्यक्त करण्याच्या अकृत्रिम शैलीतून साकार होते. त्याचा पुन्हा प्रत्यय देणारी “शेवटची लाओग्राफिया” ही त्यांची दुसरी नवी कादंबरी आहे. जादुई वास्तववाद आणि एबसरडिस्ट फिक्शन- असंगत कथा यांच्या मिश्रणातून साकार झालेली ही कादंबरी लेखनाच्या साऱ्या प्रचलित धारणांना छेद देणारी व वाचकांना वाचताना चक्रावून सोडणारी आहे. ती आजच्या विखंडीत जगाचे आणि निरर्थक जगण्याचे विरुप अद्भुत प्रतिमा, चमत्कृतीपूर्ण लोककथा- पुराणकथांच्या आधुनिक परिप्रेक्ष्यातील पुर्नवाचनाने प्रभावीपणे व्यक्त करते.
या कादंबरीचं कथानक सांगण्यात फारसा मतलब नाही. कारण निवेदकाचे आजचे जगणे म्हणजे वरकरणी काही न घडता व्यतीत होणारा दिनक्रम आहे. या निरर्थक जगण्यात रंग भरण्याचे त्याचे मार्ग म्हणजे मित्रांसोबत दरमहा एके रात्री भूत- प्रेत- योनीजगत व पिशाच्च संमंधाच्या खऱ्या ,खोट्या अतिरंजित कथा सांगणे आणि मचूळ आयुष्यात थोडी थरारकता भरणे होय. कादंबरीत वारंवार येणारा निवेदकाचा अलटर इगो असलेला आगंतुक व त्याद्वारे विविध रुपात चित्रित झालेली व्यक्तिरेखा, सतत स्वप्नात येणारा पंख असलेला घोडा, कचऱ्याच्या निमित्ताने घडणारी स्मशानाची सफर, त्याचं प्रेतं जाळायला आली की आनंदी होणं … अशा असंगत प्रसंग, किस्से व लोककथांच्या कथानातून जीवनातले तुटलेपण, संवादहिनता, नातेसंबधातली निरार्थकता लेखक
एब्सर्ड फिक्शन शैलीत सांगत वाचकांना स्तिमित करतो.”त्यानंतर
“काळमेकर लाइव्ह” वर
प्रा.डाँ. दिपक बोरगावे
(ज्येष्ठ समीक्षक,कवी,अनुवादक)म्हणाले
अलिकडचे महत्त्वाचे कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांची ” ‘काळ’ मेकर लाइव्ह” ही कादंबरी अपारंपरिक आहे. ज्याला रेमंड विल्यम्स सांस्कृतिक भौतिकवाद (Cultural Materialism) म्हणतात, त्या आजच्या सांस्कृतिक भौतिकतेशी ही कादंबरी भिडताना दिसते.ही कादंबरी ही आऊटस्टँडींग कादंबरी आहे.ती २१ व्या शतकाची आजची आणि उद्याची कादंबरी आहे.
या अशा सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि तात्विक अर्थाने विस्कळीत आणि विघटित झालेल्या समाजात कोणतेच कथन होऊ शकत नाही. पारंपरिक कथनशास्त्राप्रमाणे आज आपणाला कोणताच घटनाक्रम सांगता येणे कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘घटना’ हीच मुळात अस्तित्वात नाही. माणूस, समाज, व्यक्ती यांच्याप्रमाणेच तिही कोसळलेली आहे. व्यक्तीचे आणि समाजाचे हे कोसळलेपण या कादंबरीत येते (यालाच एक उत्तराधुनिक घटित (Postmodern Phenomenon) म्हणावे लागेल). याचमुळे या कादंबरीत कोणी नायक, नायिका नाही. जर काही असतीलच, तर सगळेच नायक आणि सगळ्याच नायिका आहेत. आणि त्याचबरोबर प्रत्येक नायक आणि नायिकांचे क्षुद्रीकरण आणि कचराकरण (Trivialization) झाले आहेत. रहम्या, म्हातारा, बहुरूपीया आणि ‘मी’ अशी काही पात्रे या कादंबरीत येतात. पण ती पात्रे म्हणून कमी आणि आशय म्हणून अधिक येतात. ‘मी’ हा प्रथम पुरुषी निवेदक आहे. आणि तोच ही ‘गोष्ट नसलेली’ गोष्ट सांगतो आहे.”त्यानंतर अध्यक्ष
श्री.भारत सासणे
(ज्येष्ठ साहित्यिक ,माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)यांनी आपले अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले.यात त्यांनी मराठी कादंबरीतील नवता म्हणजे काय?साठोत्तरी कादंबरी,नव्वदोत्तरी कादंबरी याचा आढावा घेतला.ते पुढे म्हणाले,”प्रा डाँ बाळासाहेब लबडे यांची कादंबरी स्वरूप आणि चिकित्सा या विषयावर परिसंवादाचा विषय खूप महत्वपुर्ण आहे.बाळासाहेब लबडे हे आजचे नव कादंबरीकार आहेत.त्यांच्या तीन कादंबऱ्या ह्या मराठी साहित्याला नेमकं वेगळं देणे देतात. त्यांच्या नवतेचं वेगळेपण काय आहे कुणाला त्या पहिल्या उत्तर आधुनिक वाटतात तर कुणाला मनोविश्लेषण प्रवाहातील वाटतात तर कुणाला खऱ्या देशीवादी कथनाच्या वाटतात तर काहिंना रूपकात्मक तर काहींना फँन्टसी तर काहींना उत्तर उत्तर वास्तववादी तर काहींना जागतीक पातळीच्या वाटतात तर काहींना ह्यांची वर्गवारीही करता येत नाही मला वाटतं. या सर्वांचं मिश्रण त्यांच्या कादंबऱ्यांत आहे. त्याचा घाट, चाकोरी एकदम वेगळी आहे पुर्वपरंपरेपेक्षा वेगळी कादंबरी लिहीली आहे. या कादंबरऱ्यांवर समीक्षकांनी लिहीलं पाहिजे.हे उद्याचं भविष्य आणि आजचे वास्तव लिहीणारे लेखक आहे ज्यांना चांगलं व्हिजन आहे. या कादंबरऱ्या खरंच बुकरच्या गुणवत्तेच्या आहेत यासाठी त्या इंग्रजीत अनुवादीत झाल्या पाहिजेत आणि यावर चर्चासत्रांचे आयोजन केले गेले पाहिजे मराठी समीक्षकांनी बोलायला पाहिजे.व्यापक नवा मानवतावाद त्यांना अपेक्षित असावा असे दिसते आहे.
उपस्थितांचे आभार डॉ.संजय बोरूडे यांनी मानले.
—