सभापती, उपसभापती अशी मानाची पदे उपभोगली त्यांनी काय केले ?- समृद्धी घाग
संतोष कोत्रे l लांजा -: तालुक्यातील सालपे गावांमध्ये स्मशानभूमी शेड नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात याचा मोठा त्रास होत होतो. या गावातून आजवर पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी मानाची पदे भूषवलेल्या लोकप्रतिनिधींनी गावासाठी नेमका काय विकास केला? असा सवाल भाजपाच्या महिला उद्योग आघाडीच्या तालुका अध्यक्ष समृद्धी घाग यांनी उपस्थित केला आहे.
लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या सालपे गावात अद्यापही स्मशानभूमी शेड नाही. तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर उघड्यावर प्रेत दहन करावे लागते. या समस्येकडे समृद्धी घाग यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, सालपे गावातील जनतेने शिवसेना पक्षाला अनेक वर्ष एक हाती सत्ता दिली. गावातील दत्ता कदम यांना सतत तीन वेळा पंचायत समिती लांजावर निवडून दिले. त्यांनी
तालुकाचे सभापती पद भूषविले .जिल्हा परिषद सदस्य म्हणून दत्ता कदम यांना निवडून दिले. तसेच भूमिपुत्र श्रीकांत कांबळे हे गेले काही वर्ष लांजा तालुका पंचायत समितीवर उपसभापती होते .अशा भूमिपुत्रांनी गावात स्मशानभूमीची व्यवस्था करायला हवी होती पण एवढ्या मोठ्या पदावर असूनही सालपे गावात स्मशानभूमीची व्यवस्था यांनी केली नाही .
तसेच सुभाष तावडे हे पाच वर्ष सरपंच होते आणि सुभाष तावडे यांच्या पत्नी देखील पाच वर्ष सरपंच होत्या.तावडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत. सौ. तावडे या सरपंच असताना यांच्याशी स्मशानभूमी होण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीही जनतेच्या या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते.
स्मशानभूमीशेड नसल्यामुळे अनेक नागरिकांना मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतांची विटंबना होत असते. माणसांना मृत्यूनंतर अशा यातना देणे हे खूप दुर्दैवाची बाब आहे .
स्मशानभूमी शेड व्हावी म्हणून येथील धडाडीचे कार्यकर्ते संकेत घाग यांनी यापूर्वी एक दिवसीय उपोषण केले होते. हे उपोषण सोडावे म्हणून माजी उपसभापती श्रीकांत कांबळे यांनी स्मशानशेड बांधण्याचे आश्वासन दिले होते. तसेच गावातील सगळ्या समस्या आम्ही लवकरात लवकर सोडवतो असे सांगितले होते.पण अद्यापही त्यांनी एकही समस्या सोडवली नाही असे भाजपाच्या महिला उद्योग आघाडीच्या तालुका अध्यक्ष समृद्धी घाग यांनी सांगितले.
: