मानिनी आणि मंथन आग्रे या बहीण भावाची नासा इस्त्रोसाठी निवड

दापोली l प्रतिनिधी:गेल्या वर्षापासून जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्मिती, संशोधनविषयक जिज्ञासूवृत्ती वाढविणार्‍या विद्यार्थ्यामधून भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी निवडक प्रज्ञावान विद्याथ्यांना NASA अमेरीका ISRO, भारत या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थाना भेट घडवून आणणे ही एक महत्वाकाक्षी योजना राबविण्यात येत असून सदर योजना ही फक्त जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि.प. शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यापुरतीच मर्यादीत असते,याकरीता विद्यार्थ्यांची केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा विविध पातळींवर चाळणी परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या.यामध्ये दापोली तालुक्यातील जि.प.शाळा मळे येथील सख्खे बहिण -भाऊ मानिनी मंगेश आग्रे आणि मंथन मंगेश आग्रे यांनी बाजी मारली.

एकाच शाळेतील या दोन्ही विद्यार्थ्यांना इस्त्रो ;तर मानिनी हिला नासा अभ्यास दौर्‍यासाठी जाता येणार आहे. मूळ उसगाव गावातील रहिवासी असलेली सामान्य कुटूंबातील ही मुले आई कामानिमित्त मुंबई येथे असल्यामुळे,मळे येथील मामा विकास पांदे यांचेकडे शिक्षणासाठी आली; तशी मळे शाळा व्हिजन दापोली सुरु झालेपासून प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती,नवोदय यासाठी प्रसिध्द आहेच,या वर्षी मानिनी आणि मंथन यांच्या रुपाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला.

तसे दोघांनाही नासासाठी जाण्याची संधी मिळाली असती;पण जि.प.ने केलेल्या नियमानुसार इ.सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाच नासा दौरा असल्यामुळे मंथनला फक्त इस्त्रोपर्यंतच जाता येणार असे असले तरी पुढील शैक्षणिक वर्षात तो सातवीच्या वर्गात असणार आहे.तेव्हा तो संधी प्राप्त करू शकेल असे मुख्याध्यापक दिनेश चिपटे यांनी यावेळी सांगितले.सर्वसाधारण कुटूंबातील विद्यार्थ्यांनाही अशा अभ्यास दौर्‍यासाठी संधी देणारी रत्नागिरी ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले. तसेच व्हिजन दापोलीच्या सरावामुळे तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावतांना दिसत असल्याचेही ते म्हणाले.२४२७ विद्यार्थ्यांमधून तालुक्यातील २ विद्यार्थी नासा;तर त्यांचेसह इतर चार असे दापोली तालुक्यातील

मानिनी मंगेश आग्रे शाळा मळे व शुभम जयंत जोशी शाळा कोळथरे यांना अमेरिका नासासाठी तर अंशुल पाटील-कुडावळे नं.१,आरोही मुलुख-चंद्रनगर, मंथन आग्रे – मळे, जान्हवी तांबुटकर – विरसई अशा सहा विद्यार्थ्यांची इस्त्रो दौर्‍यासाठी निवड झाली असून सर्वत्र या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.मंथन आणि मानिनी या सख्ख्या बंधु-भगिणीचे विशेष कौतुक होत आहे. यांना मुख्या.दिनेश चिपटे,शिक्षक वैशाली पाटील,रश्मी पेवेकर,प्रकाश पाते आदिंचे मार्गदर्शन तर सर्व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांसाठी दिनेश नाटेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.नोडल आॅफीसर बळीराम राठोड, तसेच विस्तार अधिकारी संजय दरेकर,पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे,तसेच सर्व केंद्रप्रमुख यांची प्रेरणा मिळाली.