तुमको मराठी आती है क्या ?
(संतोष वायंगणकर) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक म्हणून स्थापन झालेल्या बँकेच दोन-तीनवेळा नामकरण करण्यात आले. आता विदर्भ-कोकण ग्रामीण बँक असं नाव असलेल्या या बँकेत मराठी बोलता येणं, लिहिता येणं अनिवार्य आहे. असे असतानाही आता होणाऱ्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणावर उत्तरप्रदेश, बिहारकडील तरूण-तरूणी बँकेच्या सेवेत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत मराठीचा ‘पुळका’ असणारा कोणताच राजकिय पक्ष बँक सेवेकडे फार गांभिर्याने घेत नसल्याने बँकिंग क्षेत्रातही मराठी टक्का घसरलेला दिसतो.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बचत करता यावी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज सुलभ मिळावा यासाठी तत्कालिन सरकारने त्या-त्या विभागांसाठी ग्रामीण बँक स्थापन केली. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ग्रामीण बँक सुरू करण्यात आली. मधल्या कालावधीत या बँकेत सोलापूर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या बँकेने कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ-कोकण ग्रामीण बँक नाव असलेल्या या बँकेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बँकेच्या ५० शाखा आहेत. या बँकेच्या जास्तीच्या शाखा या ग्रामीण भागात आहेत. यामुळे या बँकेचा ग्राहक हा ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी असतो. यामुळेच या बँकेत नोकरभरती करताना मराठी भाषा सक्तीची आहे. मात्र, तरीही या बँकेच्या मुलाखती घेणारे चेअरमनच अमराठी त्यांना मराठी येत नाही.
बँक कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या तरूण-तरूणींना चेअरमन विचारणार, तुमको मराठी आती है क्या ? या हिंदीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच उत्तर अमराठी असणारा कँडीडेट उतरतो हांजी, मराठी आती है. यामुळेच स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये येणारा स्टाफ हा बहुतांश हिंदी भाषिक असतो. परंतु विदर्भ-कोकण ग्रामीण बँकसारख्या बँकेमध्ये स्टाफला मराठी येणं सक्तीच असतानाही अमराठींची टक्केवारी फार मोठी आहे. ग्रामीण भागातून येणारी वयोवृद्धा जेव्हा श्रावणबाळ योजनेतील पेन्शन जमा झाली का ? याची चौकशी मालवणीतून करताना हिंदी भाषिक कर्मचाऱ्याला काहीच समजत नाही. कोकणातील या ग्रामीण बँकेतील अनेक शाखेतील ही स्थिती आहे. विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेत क्लर्क म्हणून सेवेत दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन हे ६५०००/- रू.पासून सुरू होते. कोकणात अनेक कॉमर्सचे बेकार तरूण आहेत. परंतु बँकिंग क्षेत्राची परिक्षा द्यायला फारच कमी जातात. यामुळे मग परराज्यातून कर्मचाऱ्यांची भरती होते.