लोटिस्मा’त सुरेश भार्गव बेहेरे यांना श्रद्धांजली

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतीच वाचनालयाच्या कलादालन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ‘दाते’ सुरेश भार्गव बेहेरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाचनालयाने उभारलेल्या कलादालनाला सुरेश भार्गव बेहेरे यांचे नाव देण्यात आले आहे. श्रद्धांजली सभेत वाचनालयाचे समन्वयक प्रकाश देशपांडे यांनी बेहेरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. बेहेरे यांनी त्यांच्या जीवनात, विज्ञान प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीचे काम केले होते. बेहेरे यांचे बालपणीचे मित्र असलेले दादा कारेकर यांनी चिपळुणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

कारेकर यांच्याहस्ते बेहेरे यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनिरुद्ध बेहेरे यांनी बोलताना, सुरेश बेहेरे हे ‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या कामाबाबत समाधानी आणि आनंदी असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. रेखा देशपांडे, वाचनालयाचे उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, विनायक ओक, अरुण इंगवले, सुनील कुलकर्णी, श्रीराम दांडेकर, धीरज वाटेकर, अभिजित देशमाने, मनीषा दामले, प्राची जोशी, मंगेश बापट, मधुसूदन केतकर, प्रकाश घायाळकर उपस्थित होते. शांतिमंत्राने श्रद्धांजली सभेची सांगता झाली.