भंडारी समाजातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी घडावेत : सत्यवान रेडकर

कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ मुंबईच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सभारंभ

मुंबई : आपल्या मुलांमध्ये कमालीची क्षमता आहे परंतु मार्गदर्शनाच्या अभावी हे विद्यार्थी मागे राहतात परिणामी शासकीय संधींचा लाभ घेण्यात कमी पडतात. माझा शैक्षणिक उपक्रम नसून ही एक चळवळ आहे व याची जनजागृती होणे अपेक्षित आहे. यापुढे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा प्रसार प्रत्येक घरा-घरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करा. सर्वांना निशुल्क मार्गदर्शन प्राप्त होत राहील. भंडारी समाजातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा मुंबई सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी तथा तिमिरातुनी तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांनी
व्यक्त केली.
कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई संस्थेच्यावतीने ९७ वा विद्यार्थी गुणगौरव सभारंभ कित्ते भंडारी सभागृह, दादर (प) येथे संपन्न झाला. प्रथम रावबहादुर सिताराम केशव बोले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथि व मार्गदर्शक स्वरूपात सत्यवान रेडकर बोलत होते. यावेळी नरेंद्र शिरधनकर, सौ. तृप्ती हातिसकर मंचावर उपस्थित होते.
गुणगौरव सोहळ्यात उपस्थित विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यासाठी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी उपस्थित प्रेक्षकवर्गास संबोधित करीत असताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विविध उदाहरणे देत स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती, जीवनप्रवास, त्यांचा अभ्यास करण्याची पद्धती यांवर कटाक्ष टाकला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी मंचावर येऊन आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या.
दे ललकारी, जय भंडारी या जयघोषाने सभागृहात चैतन्यमय वातावरण निर्मित झाले व उपस्थितांना एक नवीन प्रेरणा प्राप्त झाली. मार्गदर्शन व्याख्यान समाप्तीनंतर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पडला यावेळेस विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र तसेच भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. भरत शेट्ये (अध्यक्ष), श्री. आनंद मयेकर (उपाध्यक्ष), श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर (विश्वस्त), श्री. भूपेंद्र देवकर (निवेदक व कार्याध्यक्ष), श्री. मधुकर तोडणकर (विश्वस्त), श्री. दिपक तवसाळकर (विश्वस्त), श्री. विलास सुर्वे (विश्वस्त) त्याचप्रमाणे श्री. व सौ. नंदिता दत्ता पेडणेकर, श्री. व सौ. अरूणा अरविंद पारकर उपस्थित होते.
श्री. संजय भरणकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. संतोष मांजरेकर यांनी निमंत्रक व कार्यक्रमाचे अन्य व्यवस्थापन स्वरूपात आपली भूमिका पार पाडली व अन्य सदस्यांनी सुद्धा यात आपले योगदान दिले. राष्ट्रगीत समाप्तिनंतर कार्यक्रम संपन्न झाला.