मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा
समाजासोबत राहण्याचा निर्णय
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
मात्र, निर्णयावर ठाम
चिपळूण (प्रतिनिधी):-– मराठा समाजाच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर समाजासोबत राहण्याचा चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी स्पष्ट करीत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी व माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केली. रत्नागिरी जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजकीय क्षेत्रातील पहिलाच राजीनामा प्रशांत यादव यांचा ठरला आहे. या राजीनाम्याने चिपळूण काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यादव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी स्वतः समाजाचा प्रतिनिधी म्हणून उतरताना काँग्रेस पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत श्री. यादव राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी ते म्हणाले की, मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संयम राखून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासन- प्रशासनाकडून अपेक्षा होत्या. मात्र, त्या अपेक्षाभंग होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे जालना येथील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी आपल्या सर्वांची मागणी आहे, असे यादव यांनी यावेळी नमूद केले.
चिपळूण काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असलो तरी सध्य परिस्थितीत समाजासोबत आपल्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. समाजाच्या प्लॅटफॉर्मवर जात असताना समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सगळ्या पक्षांसोबत मराठा समाजाची नाराजी आहे. मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे. ती रास्त मागणी पाहता समाजासोबत राहण्याचा निर्णय घेत असल्याचे यावेळी प्रशांत यादव यांनी स्पष्ट करत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची यावेळी घोषणा केली.
मराठा समाजाची आरक्षणाची लढाई एकत्रितपणे लढली पाहिजे, अशी आपली भावना आहे. ही लढाई कधी संपेल ? हे सांगू शकत नाही. मात्र, तोपर्यंत समाजासोबत राहण्याचा निर्णय घेत असून पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे स्पष्ट करीत मराठा आरक्षणाच्या लढाईनंतर पक्षीय कामासंदर्भात फेरविचार होईल, असे देखील प्रशांत यादव यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा चिटणीस कैसर देसाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सचिव पूर्वा आयरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज दळी, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष रुपेश आवले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष देसाई, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रवीना गुजर, संभाजी ब्रिगेडचे मकरंद जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते अ. ल. माळी, एस. आर. पाटील, संजय साळवी, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.