अतिक्रमण हटाव मोहीम कायमस्वरूपी टिकणार का? नागरिकांमधून शंका उपस्थित
चिपळूण (प्रतिनिधी) : नगर परिषद प्रशासनाकडून प्रदीर्घ कालावधीनंतर आज मंगळवार दि. ३१ रोजी शहरातील वर्दळीच्या भागासह चौकाचौकात असलेली अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटवली. मात्र, मागील अनेक मोहिमांचा अनुभव लक्षात घेता दोन दिवसानंतर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमणे उभी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या स्वच्छता मोहिमेसारखीच चिपळूण न.प.चीही अतिक्रमण हटाव मोहीम ही कायमस्वरूपी टिकणार आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.
गेली दोन-अडीच वर्षे चिपळूण नगर परिषदेत प्रशासनाचा कारभार सुरू आहे. दरम्यानच्या काळात प्रशासनाचे नियंत्रण असल्यामुळे लोकप्रतिनिधी केवळ विविध माध्यमातून शहरातील अतिक्रमणांवर चर्चा करीत असत. संबंधित लोकप्रतिनिधींच्या काळातही अनेकवेळा अतिक्रमण हटाव मोहिमा झाल्या. सभागृहात पोटतिडकीने चर्चा झाली. सभागृहाच्या सूचनेनुसार प्रशासन अतिक्रमण हटवत गेले. मात्र, त्यातीलच काही लोकप्रतिनिधी प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याबाबत व गोरगरिबांवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीने सल्ला देऊन अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत होते. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या भागासह मुख्य चौक व रस्त्यावर गेल्या दोन वर्षाच्या काळात अतिक्रमण करणाऱ्यांचे पेव फुटले होते. नागरिकांकडून व विविध माध्यमातून या विषयात अनेकवेळा संताप व तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या. अखेर प्रशासनाने दसऱ्यापूर्वीच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कठोर कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधित विक्रेते, व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना इशारा देण्यात आला. अशा बैठकीतून संबंधितांनी मुदत मागून घेतली. मुदत संपल्यानंतरही संबंधित व्यावसायिक व विक्रेत्यांनी आपले बस्तान हलविले नाही. तर अधिक जोमाने जागा व्यापून अतिक्रमण सुरू ठेवले. अखेर न.प. प्रशासनाने आज सकाळी ९.४५ वाजल्यापासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. मात्र, ही कारवाई तकलादू स्वरूपाची राहू नये. सर्व अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविली जावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे रस्ता, चिंचनाका, अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकूल परिसर, बाजारपेठ, पानगल्ली, भेंडीनाका तसेच सायंकाळच्यावेळी शिवाजीचौक ते बहादूरशेख चौक या भागातील अतिक्रमणे, टपऱ्या यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून ही कारवाई झाली. चिपळूण न.प.च्या सफाई कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, राजू खातू, विनायक सावंत, बापू साडविलकर, वैभव निवाते, महेश जाधव, न. प. अभियंता खताल यांच्या देखरेखीखाली तर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.