घाणेखुंट येथे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

खेड | प्रतिनिधी : सध्याच्या दगदगीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे ताणतणाव, शारीरिक आजारपण, एमआयडीसीतील प्रदूषण व तसेच कोविडच्या प्रादुर्भावानंतर उद्भवलेले दुष्परिणाम व आरोग्याच्या दैनंदिन तक्रारी याचा विचार करून गोदरेज अॅग्रोवेट लि. परिवर्तन संस्था व घाणेखुंट ग्रामपंचायतीने तज्ज्ञ डॉक्टर्सचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेतले.

घाणेखुंट गावच्या १५० रुणांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात आली. यामध्ये प्रत्येकाची हिमोग्लोबिन, शुगर, ब्लड प्रेशर तपासण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तिला पौष्टिक खाद्य व फळे देण्यात आली. या शिबिरामुळे ग्रामपंचायतीच्या आरोग्यदायी व सुदृढ गाव या मोहिमेला हातभार लागला, असे उपसरपंच नजीर सुर्वे यांनी सांगितले. परिवर्तन संस्थेचे समन्वयक खेतले यांनी योग्य आहार व व्यायामाचा मूलमंत्र दिला. डॉ. लोहार, डॉ. राठोड, डॉ. वैष्णवी या डॉक्टरांनी तपासणी केली. याप्रसंगी सदस्य रविना खांबल, नितेश तांबे, रत्नाकर खेराडे, कासीम सुर्वे, बदरुद्दीन सुर्वे, दत्ताराम पड्याळ, सुलताना सुर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.