कुणबी समाजोन्नती संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्ह्यामंध्ये मोठया प्रमाणावर रिक्त असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पदांमुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला बसत आहे. त्यामुळे शासनाने रत्नागिरी जिल्हयासह राज्यातील रिक्त असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरून सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण समिती शाखा राजापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अग्रेशीत करण्यात आलेले निवेदन नायब तहसिलदार सौ. दिपाली पंडीत यांच्याकडे ग्रामिण समितीचे अध्यक्ष दिपक नागले व पदाधिकाऱ्यांनी सुपुर्द केले.
तलाठी आणि मंडळ अधिकारी संवर्गाच्या रिक्त पदांमुळे जनतेची होणारी गैरसोय आणि त्याचा प्रशासनावर पडणारा भार लक्षात घेता शासनाने ही रिक्त पदे भरावीत यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असून आपल्या निवेदनावर कार्यवाही होण्याचे दृष्टीने ते मुख्यमंत्री महोदयाना पाठविण्यात येईल अशी ग्वाही नायब तहसिलदार सौ. पंडीत यांनी दिली.
या निवेदनात तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासह अन्य मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अतिरिक्त तलाठी सजांच्या कार्यालयाच्या चाव्या महसूल प्रशासनाकडे जमा करून छेडलेल्या आंदोलनाची भर पडली होती. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्ग व ग्रामस्थ यांना सोसावा लागला होता. तलाठी व मंडळ अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना सातबारा, आठ-अ, व इतर महसुली दाखले मिळत नसल्याने प्रचंड गैरसोय झाली होती. सद्य स्थितीमध्ये तलाठी, मंडल अधिकारी यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असले तरी जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत रिक्त पदांचा मूळ प्रश्न जैसे थे राहणार आहे. त्यामुळे शासनाने मानवतावादी दृष्टीकोनातून रिक्त तलाठी, मंडल अधिकारी पद भरतीबाबत सकारात्मक विचार करावा व तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष सत्यवान कणेरी, सचिव चंद्रकांत जानस्कर, खजिनदार जितेंद्र पाटकर, कार्यकारिणी सदस्य प्रकाश मांडवकर, संतोष हातणकर, राजू कार्शिंगकर, प्रकाश लोळगे, सौ. मानसी दिवटे, श्रीकांत राघव, संतोष मोंडे, सौ. सावित्री कणेरी, माजी सैनिक सखाराम बावकर आदी उपस्थीत होते.