मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका मराठा समाजाची रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होणार सभा
लांजा( प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणे आणि मराठा आरक्षणासाठी कशाप्रकारे या लढ्याला सामोरे जायचे हे ठरविण्यासाठी लांजा तालुका मराठा समाजाची महत्त्वाची सभा रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज गेली अनेक वर्षे झगडतोय, लढतोय. यासाठी रेकॉर्डब्रेक मोर्चे काढले व आंदोलनेही केली. मात्र अद्यापही हक्काचे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरूण पिढी नैराश्यच्या गर्तेत गेलीय. शेकडो तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात चांगली गुणवत्ता असूनही आपल्या मुलांना पुढे जाता येत नाही व आरक्षणच नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही.
या पार्श्वभूमीवर लांजा तालुका मराठा समाज अध्यक्ष सुभाष राणे यांनी सांगितले की, आता मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी मराठा खंबीरपणे उभा ठाकला आणि आणि आपल्या निग्रहाने खंबीर भूमिकेने शासनाला विचार करावयास भाग पडले आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपला जीव पणाला लावला आहे. जी काही जमा पुंजी असेल ती सर्व त्यांनी समाजासाठी समर्पित लावली आहे. त्यामुळे आपलेही नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे की, मनोज जरांगे पाटील यांना आपण जाहीर पाठिंबा दिला पाहिजे व आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.यासाठी आपल्या तालुक्यातील मराठा समाजाची मते जाणून घेण्यासाठी व आरक्षणाच्या लढ्याला यापुढे कश्या प्रकारे सामोरे जायचे यासाठी लांजा तालुका मराठा समाजाची अत्यंत महत्त्वाची सभा रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. लांजा नागरी सहकारी पतपेढी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.तरी या सभेला तालुक्यातील तमाम मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष
सुभाष राणे यांनी केले आहे