मराठीसह हिंदी आणि इंग्रजी बॅनर ठरताहेत लक्षवेधी
रत्नागिरी | प्रतिनिधी : ‘सगळेच राजकारणी सारखे नसतात काही निलेश राणे सुद्धा असतात’ , ‘द बॉस हॅज द टायटल, ए लीडर हॅज द पीपल’, ‘वेलकमिंग द मोस्ट प्रॉमिसिंग लीडर ऑफ कोकण’ असे विविध स्वागताचे फलक रत्नागिरीसह राजापूर, लांजा, हातखंबापासून सर्वत्र झळकत असून आपल्या लाडक्या नेत्याचे म्हणजेच भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
अनेक राजकीय घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे हे उद्या गुरुवारी रत्नागिरी दौर्यावर येत आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात सहभागी होणारा नेता अशी निलेश राणे यांची कोकणासह महाराष्ट्रात ख्याती आहे. त्यामुळे या घडामोडीनंतर आपले नेते रत्नागिरीत केव्हा येतात याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा होती. निलेश राणे गुरुवारी रत्नागिरी दौर्यावर येत असताना राजापुरपासूनच त्यांच्या स्वागताचे फलक सर्वत्र लागले आहेत. राजापूर येथील हातीवले टोल नाका येथे निलेश राणे यांचे सकाळी आगमन होणार आहे. तेथे जकात नाका येथे त्यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. त्यानंतर महामार्गावरील कुवे येथून रॅली काढण्यात येणार असून ती लांजापर्यंत असेल. लांजा येथे त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वागत करणार आहेत. लांजा मुख्य बाजारपेठेत सभा होणार आहे.
हातखंबा येथे रत्नागिरी तालुक्याकडून त्यांचे जल्लोषी स्वागत होणार आहे. तेथूनच रॅली निघणार असून साळवी स्टॉप येथे मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला निलेश राणे पुष्पहार अर्पण करतील आणि आठवडा बाजार येथील भाजपा कार्यालयात त्यांची सभा होणार आहे.
कोकणचा नेतृत्व म्हणून निलेश राणे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे आश्वासक नेतृत्व आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे ते लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. या आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते यांनी सर्वत्र बॅनर लावले आहेत. यावेळचे बॅनर लक्षवेधी ठरले असून केवळ नेहमीचेच बॅनर न राहता इंग्लिश आणि हिंदी मधून सुद्धा स्वागताचे बॅनर झळकले आहेत. त्यातीलच एका बॅनर वर “क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै, कर्तव्य पथपर जो भी मिला, यह भी सही वो भी सही, वरदान नही मांगुंगा’ हो कुछ पर हार नही मानुंगा” अशा ओळी लक्षवेधी ठरल्या आहेत.