कोकणात भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावा –निलेश राणे

राजापूर (प्रतिनिधी): संपुर्ण कोकणात आपल्याला भाजपा पक्ष संघटना अधिक मजबूत करावयाची आहे. त्यासाठी नव्या जोमाने मैदानात आपण उतरलेलो असून सगळयांनी आपले सर्वस्व पणाला लावून भविष्यात पक्षासाठी काम करावयाचे आहे असा कानमंत्र भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

राजापुर शहरात जकात नाक्यावर निलेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी आपण सगळयांनी केलेल्या भव्य अशा स्वागताने आपण भारावून गेल्याचे नमुद करत रत्नागिरी वासीयांनी कायमच राणे कुटुंबावर प्रेम केलेले आहे, रत्नागिरीत नियमित आलो, कधी खूप दिवसांनी आलो तरी स्वागतात कोणतीही कमतरता कधी राहिली नाही, आपल्या कुटुंबातील एक घटक मानून आपण सगळयांनी आमच्यावर प्रेम केलेले आहे. ते आम्ही कधीही विसणार नाहीत. ते प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहुद्या असे आवाहन राणे यांनी केले.
आपल्याला कोकणात भाजपा पक्ष संघटन अधिक बळकट करावयाचे आहे. आगामी निवडणूका लक्षात घेता यासाठी आता आपल्या प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागणार आहेत हे लक्षात घ्या आणि पक्षाचे काम करा असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.