सराईत चोरटा प्रकाश पाटील याचा जामीन फेटाळला

 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि गोवा राज्यात घरफोडी प्रकरणी ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईत चोरटा प्रकाश विनायक पाटील याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

सराईत चोरटा आरोपी प्रकाश विनायक पाटील यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाणे मध्ये दोन गुन्हे तर बांदा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा असे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तिन्ही गुन्ह्यातील आरोपींचा जामीन सावंतवाडी न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपी प्रकाश विनायक पाटील याने वरील तिन्ही गुन्ह्यात जामीन मिळणे करता जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश भारुका यांचे न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. प्रकाश पाटील सराईत आरोपी असल्याने आरोपीच्या जामीनास अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी तीव्र आक्षेप घेत युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पाटील यांचे तीनही जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले. दरम्यान, प्रकाश पाटील विरुद्ध सुमारे 50 पेक्षा अधिक गोवा, कर्नाटक राज्य आणि कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे दाखल गुन्हे दाखल आहेत.