केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये अशोक घाटे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांच्या मेळाव्यात येथील ज्येष्ठ उद्योजक अशोक घाटे यांना त्यांच्या अमृत महोत्सवाचा योग साधून उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.केबीबीएफच्या ग्लोबल मीटला काल (दि. १४) रत्नागिरीत प्रारंभ झाला. कनेक्ट टू रिज्युविनेट या संकल्पनेवर आधारित ही मीट दोन दिवसांची आहे. याच मीटमध्ये केबीबीएफ ग्लोबलचे अध्यक्ष अमित शहाणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. घाटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ उद्योजक आणि मुख्य प्रायोजक कौस्तुभ कळके, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, ठाकूर फायनान्सचे सदानंद ठाकूर, कैरी विश्रांतीचे अभय खेर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील व्यवसाय, उद्योग तसेच व्यापार करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या बांधवांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये वैचारिक तसेच व्यावसायिक देवाणघेवाण करणे आणि त्यातून ज्ञातिबांधवांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देणे या उद्देशाने कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन ही संस्था काम करते. रत्नागिरीत या संस्थेचे कार्य गेली पाच वर्षे सुरू आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक ज्ञातिबांधवांच्या व्यवसाय-उद्योगाला चालना मिळावी, यासाठी त्यांचा व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नेहमीचा व्यवसाय करताना व्यावसायिकांनी इतर व्यवसायांकडेही वळावे, या दृष्टिकोनातून कनेक्ट टू रिज्युविनेट या संकल्पनेवर यावर्षीचा मेळावा आधारलेला आहे. नवे विचार, वेगवेगळ्या संकल्पना, नव्या कल्पना आणि आपल्या व्यवसायाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे, अशी अपेक्षा प्रास्ताविकात रत्नागिरी चाप्टरच्या अध्यक्ष शिल्पा करकरे यांनी व्यक्त केली. यावेळी इंजिनीयर अशोक घाटे यांनी वैद्य आशुतोष गुर्जर यांना तयार करून दिलेल्या गोळ्या तयार करण्याच्या यंत्राचे उद्घाटन करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना अशोक घाटे यांनी कोणत्या परिस्थितीत आपण मोटार सारख्या ग्रामीण भागातून येऊन मुंबईपर्यंत शिक्षणासाठी प्रवास केला आणि शिक्षण घेतल्यानंतर गावाकडील परिस्थिती लक्षात घेऊन गावाकडच्या लोकांना गावातच रोजगार देण्याचा उद्देश समोर ठेवून मुंबईतून पुन्हा रत्नागिरीत कसे आलो, याचे विवेचन केले. वयाच्या ७५ व्या वर्षीही यांत्रिक खलबत्ता वगैरे यांत्रिक उपक्रम तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. यंत्रनिर्मितीचा छंद जोपासताना इतरांची सोय होते आणि माझा वेळ जातो आनंदात जातो. तसा वेळ मी दिल्यामुळे त्या वेळेचा सन्मान झाला असे मी मानतो, असे श्री. घाटे यांनी सांगितले.

एका ज्ञातीतील व्यावसायिक म्हणून मर्यादा असल्या तरी व्यवसाय वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा अमित शहाणे यांनी यावेळी व्यक्त केली.समारंभाचे सूत्रसंचालन सई ठाकूरदेसाई आणि प्रशांत पाध्ये यांनी केले.उद्घाटन समारंभानंतर सदानंद ठाकूर यांचे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीविषयीची माहिती देणारे सत्र पार पडले.