महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदे त्वरित करा

बांदा येथे हिंदु राष्ट्रजागृती आंदोलनाद्वारे मागणी 

बांदा | प्रतिनिधी :

बांदा कट्टा कॉर्नर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

यावेळी डेगवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत देसाई, इन्सुलीच्या सौ. प्रिया नाटेकर, स्वरदा देसाई, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक हेमंत मणेरीकर, शिवराम देसाई यांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी प्रबोधन केले. या आंदोलनात ७० हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

यावेळी देशातील धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांची भीषणता सांगण्यात आली. समन्वयक हेमंत मणेरीकर म्हणाले, आर्थिक आमिषे, प्रलोभने, भावनिक जाळे आणि बळजबरी आदी अनेक माध्यमांतून गरीब आणि असहाय्य हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मांतर हे राष्ट्रांतर असल्याचे म्हटले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण सध्या घेत आहोत. वर्ष १९९० मध्ये काश्मिरमधून सुमारे साडेचार लाख हिंदूंना हुसकावून लावण्यात आले. अद्यापपर्यंत हा प्रयत्न विविध स्तरांवर सुरु आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांत हिंदु अल्पसंख्य तर ख्रिस्ती बहुसंख्यांक झाले आहेत. धर्मांतरामुळे देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाल्याने तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना संविधानानुसार जगणेही कठीण झाले आहे. एकूणच आमिष, प्रलोभने आणि बळजबरीने चालणारे हे धर्मांतराचे प्रकार संविधानाच्या विरोधात आहेत. तसेच ते मानवतेलाही काळीमा फासणारे आहेत. हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. त्यामुळे याविरोधात त्वरित कायदा केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले, श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची आफताब पुनावाला याने निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये भीती निर्माण करणारी आहे. लव्ह जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उघडकीस आल्या आहेत. एकूणच राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे याविरोधात त्वरित कायदा केला पाहिजे. याविषयीचे निवेदन महाराष्ट्राचे गृहमंत्री, तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी मंगळवार १६ जानेवारी या दिवशी सावंतवाडीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.