कणकवली : कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत उमेदवारांसमोर ईव्हीएम मशीनची पाहणी करून ती सील बंद करण्यात आली. ओटव ,बेळणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येकी ३ मतदान केंद्र आणि हळवल व वारगाव येथे प्रत्येकी १ मतदान केंद्र असणार आहे.५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
कणकवली तहसील कार्यालयात गुरुवारी तहसीलदार यांच्या दालनात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषणगाने ईव्हीएम मशीनची सीलबंद प्रक्रिया पार पडली.यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महसुल नायब तहसीलदार शिवाजी राठोड, निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे, अव्वल कारकून सत्यवान माळवे, संभाजी खाडे, शिपाई राजेश शिलवलकर यांच्यासह ग्रामपंचायत उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
सीलबंद केलेली मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत. ४ नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.