कोसुंबमधील कबड्डीपट्टु तरुणाची आत्महत्या

देवरुख :- संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. आत्महत्येत मृत झालेल्या तरुणाचे नाव रोमित लोध (३०) असे आहे. रोमित याने बुधवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात घेताच त्याला तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्रीच हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी बारा वाजण्याच्या सुमारास रोमित याची प्राणज्योत मालवली. रोमित हा कबड्डीपटू होता. त्याच्या पश्चात एक मोठा भाऊ आहे. याप्रकरणी रत्नागिरी येथील शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.