रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक सुधीर शिंदे यांना भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी शिंदे यांना सन्मानित केले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी भारत शिक्षण मंडळ कार्यकारी मंडळ सदस्य धनेश रायकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, श्री. शिंदे यांची आई सुरेखा शिंदे, पत्नी सौ. स्मिता, मुलगी समृद्धी, मावशी आरती साळवी व सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शारदोत्सवामध्ये हभप प्रवीण मुळ्ये यांचे सुश्राव्य कीर्तन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, दररोज आरती असे कार्यक्रम साजरे झाले. पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व माता- पालक संघाने या कार्यक्रमांसाठी महत्वपूर्ण सहकार्य केले. या कार्यक्रमाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
श्री. शिंदे यांच्यासमवेत शाळेमधील शिक्षिका सौ. ईशा रायंगणकर, लिपिक सौ. स्नेहा दांडेकर, संगणक शिक्षिका सौ. मंजिरी गुणे, शिक्षकेतर कर्मचारी मुरलीधर शिवगण यांना देखील उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिंदे यांनी शाळेसाठी भेट मुख्याध्यापिका सौ. कदम यांच्याकडे सुपुर्द केली.