खेड | प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी छेडलेले उपोषण स्थगित केल्याने येथील आगाराने पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई मार्गावरील रद्द केलेल्या बसफेऱ्या शुक्रवारपासून पूर्ववत केल्या. गेले तीन दिवस रद्द केलेल्या फेऱ्यांमुळे आगाराला अपेक्षित ९ लाखाहून अधिक रूपयांच्या उत्पन्नाचा फटका बसला.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून आंबेजोगाई, लातूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नालासोपारा आदी मार्गावरील दररोज येवून जावून करणाऱ्या १२ हून अधिक फेऱ्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याने आगाराला तीन दिवसात ९ लाख ३ हजार ७५७ रूपयांचा फटका बसला.
मात्र हे उपोषण स्थगित करण्यात आल्यानंतर शुक्रवारी बसस्थानकातून सकाळी ९ वाजता सुटणारी लातूर, ८ वाजताची – पुणे स्वारगेट, १० वाजताची पुणे, १०.१५ वाजताची नालासोपारा, ११.३० वाजताची कोल्हापूर, दुपारी १२ वाजताची पुणे, १.३० वाजताची पुणे, २ वाजताची मुंबई, रात्री ९.३० वाजताची पुणे आदी फेऱ्या सोडण्यात आल्या. मात्र सकाळी ७.३० वाजताची आंबेजोगाई फेरी चौथ्या दिवशीही बंद होती.