मुंबईत साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी छोटा राजनचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी कारवाई ; आप्पा पराडकर रत्नागिरी – सिंधुदुर्गचा सहसंपर्कप्रमुख
मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता निलेश उर्फ आप्पा पराडकर याला अटक केली आहे. आप्पा पराडकर हा ठाकरे गटाचा रत्नागिरी – सिंधुदुर्गचा सहसंपर्क प्रमुख आहे. शनिवारी चेंबूर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज आरोपीला भोईवाडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ हजाराचा जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने आरोपीला सात दिवस टिळक नगर पोलीस ठाण्यात हजर राहून पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.
मुंबईच्या चेंबूर परिसरात १३ जानेवारीला छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. या केकवर बिग बॉस असे लिहिण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नीलेश पराडकरला अटक केली. त्यानंतर आरोपीला भोईवाडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ हजारात जामीन मंजूर केला. छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाड पूर्व येथील करार व्हिलेज येथील गणेश मैदान आणि तानाजी नगर परिसरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच रस्त्याच्या बाजूला बॅनरही लावण्यात आले होते. छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब पोस्टर हटवत पुढील कारवाई केली.
याआधीही 2020 मध्ये ठाणे शहरात छोटा राजनला बॅनर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. तो मूळचा चेंबूरचा आहे. राजनवर अपहरण आणि खूनाच्या अशा ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातही राजन मुख्य आरोपी होता. गेल्या वर्षी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दुहेरी हत्याकांडातून छोटा राजनसह चार जणांची निर्दोष मुक्तता केली होती. 2010 मध्ये छोटा शकील टोळीतील आसिफ दाढी उर्फ छोटे मियाँ आणि शकील मोदक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. छोटा राजनवर या दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप होता.